
नागपूर : १७ तोळे सोन्याचे दागिने लंपास
नागपूर : घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी करून रोकड आणि दागिन्यांसह जवळपास १० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. पोलिसांनी जानकी रमेशलाल खिलवानी (६०) रा. महात्मा गांधी शाळेजवळच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला.
जानकी यांचा मुलगा लालचंद पुणे येथे नोकरीला आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जानकी घराला कुलूप लावून साई चांदूराम मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शनानंतर त्या औषध घेण्यासाठी डॉक्टरकडे गेल्या. यादरम्यान आरोपीने मुख्य दाराचे कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. बेडरूमच्या कपाटातून रोख १ लाख २० हजार रोख आणि १७ तोळे सोन्याचे दागिने असा १० लाख रुपयांच्या मालावर हातसाफ केला. स्वयंपाक करण्यासाठी येणारी आरती नावाची महिला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी आली असता कुलूप तुटलेले होते.
कोंडाही काढण्यात आलेला होता. तिने शेजारी राहणाऱ्या महिलेला घटनेची माहिती दिली. महिलेने लालचंदला फोन करून घटनेबाबत सांगितले. जानकी घरी पोहोचल्या असता सर्व सामान अस्तव्यस्त पडून होते. दरम्यान जरीपटका पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पंचनामा करून अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदविला. पोलिसांना कोणीतरी घराची माहिती दिल्याचा संशय आहे.
Web Title: Nagpur Robbery Gold Jewellery With 10 Lakh Cash
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..