
Nagpur : रशिया-युक्रेन युद्ध वर्षपूर्ती ; वैद्यकीय शिक्षण घेणारे आले अडचणीत
नागपूर : डॉक्टर बनून समाजसेवा करण्याच्या उद्देशाने नागपुरातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेले होते. पण अचानक युद्ध पेटले आणि जीवाच्या भीतीपोटी त्यांना शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले. वर्ष लोटूनही युद्ध सुरूच असल्यामुळे अनेक विद्यार्थी शैक्षणिक अडचणीत सापडले असून त्यांचे पालकही चिंतेत आहेत.
रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनवर हल्ला केला. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक ‘सकाळ’ने युक्रेनमध्ये एमबीबीएस करीत असलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या भावना जाणून घेतल्या.
गणपतीनगर (झिंगाबाई टाकळी) येथील रहिवाशी शिवमंगल सिंग म्हणाले, माझ्या मुलीचे (शिवांगी) लहानणापासूनच डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. मात्र बारावीत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तिला भारतातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे पैशाची जोडतोड करून मुलीला २०१६ मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला पाठविले.
सध्या ती कीव विद्यापीठात एमबीबीएस करीत आहे. फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर युद्धाचे ढग गोळा होऊ लागल्यानंतर मी तिला ताबडतोब घरी बोलावून घेतले. तेव्हापासून जवळपास एक वर्ष ती घरीच होती. मात्र तिचे हे शेवटचे महत्वाचे वर्ष असल्याने विद्यापीठाच्या सूचनेनुसार
अजुनही विरले नाही युद्धाचे ढग
गेल्या महिन्यातच आम्ही तिला युक्रेनला परत पाठविले. सध्या ती पोलंड बॉर्डरवर एका सुरक्षित ठिकाणी उर्वरित शिक्षण पूर्ण करीत आहे.
मागील एका वर्षापासून सर्वच जण युद्ध संपण्याची प्रतीक्षा करीत आहोत. पण ते लांबतच असल्याने शिवांगीचेच नव्हे तर नागपुरातील इतरही विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले आहे. शिवांगीबाबत शिवमंगल सांगतात, रात्रभर ऑनलाइन क्लासेस चालल्यानंतर तिला दिवसा नागपुरातील खासगी रुग्णालयांमध्ये प्रॅक्टिकल करावे लागत. मात्र त्याला नियमित वर्गातील (ऑफलाईन) शिक्षणाची सर येत नव्हती.
दोन-अडीच महिन्यांनी (मे महिन्यात) शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिवांगीला पदवी मिळून, ती घरी परतणार असल्याचे त्यांनी सांगितले. तोपर्यंत त्यांच्याही मनात मुलीबद्दल चिंता व धाकधूक राहणार आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी नुकताच युक्रेनचा दौरा केल्यानंतर, रशिया चिडून आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी युद्धाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
इतरही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा
शिवांगीप्रमाणेच दाभा येथे राहणाऱ्या २४ वर्षीय रुही कोलतेलाही रशिया-युक्रेन युद्धाचा फटका बसला आहे. युद्धामुळे तीसुद्धा गेल्या एक वर्षापासून घरीच आहे. मे मध्ये परीक्षा असल्यामुळे युक्रेनला जाणार असल्याचे तिने सांगितले. नागपूरसह विदर्भातील इतरही विद्यार्थ्यांची जवळपास हीच स्थिती आहे.