Nagpur: प्रादेशिक मनोरुग्णालयात रंगते दारुपार्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wine

नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात रंगते दारुपार्टी

नागपूर : एकिकडे प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतात. तर दुसरीकडे येथील मनोरुग्णांसहित कर्मचारी आणि येथील परिसराची सुरक्षा यंत्रणा सांभाळणारे सुरक्षारक्षकच कर्तव्यात कसूर करतात. मनोरुग्णालय परिसरात दारूची पार्टी रंगली असल्याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणामुळे मनोरुग्णालयाची प्रतीमा मलिन होत असल्याने रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी संबंधित सुरक्षा रक्षकासह कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

राज्यात नागपूर, पुणे, ठाणे आणि रत्नागिरी येथे प्रादेशिक मनोरुग्णालये आहेत. नागपुरात ९४० मनोरुग्ण दाखल करण्याची क्षमता आहे. मात्र, शासनाकडून पाहिजे तसे याकडे लक्ष दिले जात नाही. कर्मचाऱ्यांचा तुटवडा, औषधांचा दुष्काळ, डॉक्टरांची रिक्त पदे अशा संकटात मनोरुग्णालय सापडले आहे. सध्या ४९६ स्त्री व पुरुष मनोरुग्ण उपचार घेत आहेत. विशेष असे की, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या पुढाकारातून मनोरुग्णांचे सामाजिक पुनर्वसनाकडे जातीने लक्ष दिल्या जात आहे. मात्र दुसरीकडे मनोरुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले सुरक्षा रक्षकच रुग्णालयाच्या आवारात दारूच्या पार्ट्याचे आयोजन करीत आहेत. ‘गार्ड रूम’ मध्ये पार्टी रंगत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने मनोरुग्णांची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे.

हेही वाचा: Farm Bills: 'तो अहवाल सार्वजनिक करा'; अनिल घनवट यांची सुप्रीम कोर्टाकडे मागणी

अवघे डझनभर सुरक्षारक्षक

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या भुखंडावर अनेकांचा डोळा होता. अनेकांनी जमीन बळकावली आहे. आता अवघी ४२ एकर जमीन शिल्लक आहे. रुग्णालयाच्या सुरक्षेची जबाबदारी १२ सुरक्षारक्षक सांभाळतात. हे सर्व सुरक्षारक्षक कामावर आळीपाळीने असतात. एका पाळीत तिघेजण असतात. महिलांच्या वॉर्डात महिला सुरक्षा रक्षकांची सोय आहे. परंतु, वॉर्डाकडे जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारावरच सुरक्षारक्षकांच्या पार्ट्या होत असल्याचे दिसून येते.

प्रवेशद्वाराजवळचा हा व्हिडिओ आहे. येथे दारू पित असलेला सुरक्षारक्षक व कर्मचारी यांना प्रशासनाकडून नोटीस दिली आहे. शासनाच्या नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

-डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय

loading image
go to top