Nagpur : अधिकाऱ्यांची नियुक्ती, कर्मचाऱ्यांना डावलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : अधिकाऱ्यांची नियुक्ती, कर्मचाऱ्यांना डावलले

नागपूर : एसटीच्या पदभरतीत अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. मात्र, कर्मचाऱ्यांची उपेक्षा करण्यात आली. यामुळे एसटी महामंडळ अन्याय करीत असल्याची भावना उमेदवारांमध्ये आहे. एकीकडे नियुक्ती मिळण्याच्या अपेक्षेत उमेदवार दुसरा कामधंदा शोधत नाही. तर दुसरीकडे जगण्यासाठी व नियुक्तीसाठी तीन वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरू आहे.

आज नियुक्ती मिळेल, उद्या मिळेल या प्रतीक्षेत उमेदवारांची तीन वर्षे उलटून गेली. राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ने २०१९ मध्ये चालक तथा वाहक (कनिष्ठ) या पदासाठी सरळसेवा भरती घेतली. याचवेळी २०१९ मध्ये विभागीय वाहतूक अधिक्षक/आगार व्यवस्थापक (वाहतूक) वर्ग-२ (कनिष्ठ) या पदासाठी भरती घेण्यात आली होती. पात्र उमेदवारांना नेमणुकीच्या अनुषंगाने सेवापूर्व प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आले होते. या उमेदवारांनी १ वर्षाचे नेमणूकपूर्व प्रशिक्षण पूर्ण केल्याने नियुक्ती मिळाली. यात १० अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. मात्र, चालक तथा वाहकांची लेखी परीक्षा, वाहन चालान चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी, सेवा पूर्व प्रशिक्षण असे सर्व पदभरतीचे टप्पा पार करत राज्यातील २८०० उमेदवार पात्र ठरले.

यात नागपूर विभागातील १९० जणांचा समावेश आहे. मात्र, जवळपास तीन वर्षांचा कालावधी होऊनही या उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नाही. अधिकाऱ्यांची नियुक्ती कर्मचाऱ्यांना डावलले. अशी भावना आता या उमेदवारांमध्ये वाढू लागली आहे. नियुक्ती मिळेल या आशेपोटी पात्र उमेदवार कायमचा कामधंदा शोधू शकत नाही. कुणी डिलिव्हरी बॉयचे तर कुणी मजुरीचे तात्पुरते काम शोधून गरज भागवित आहे. मात्र, उदरनिर्वाहाकरिता आर्थिक संघर्ष त्यांचा सुरू आहे.

उपोषण, निवेदनातून लढा

पात्र उमेदवारांनी एसटी महामंडळाच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना, विभागीय स्तरावरील विभागीय नियंत्रकांना तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदने देऊन नियुक्ती देण्याची मागणी करीत ५ हजार कंत्राटी पदभरती रद्द करण्याची मागणी केली. याच मागणीसाठी आता नागपूरसह राज्यभरातील उमेदवार मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत.

२०१९ मधील वर्ग २ च्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. मात्र, आम्हाला अद्याप नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे आमच्याकरिता महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत आहे का?

- आकाश गेडाम, पात्र उमेदवार (चालक तथा वाहक)

२०१९ मध्ये ज्यांनी कोरोना काळात प्रशिक्षण प्राप्त केले. त्या पदातील अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. २०१९ मधील चालक तथा वाहकाच्या नियुक्तीला महामंडळाची सध्या स्थगिती आहे. ती रद्द करण्यात आली नाही. संपामुळे आर्थिक नुकसान व इतर आर्थिक त्यात कारण आहे. महामंडळाची आर्थिक स्थिती भक्कम होताच त्यांना सुद्धा नियुक्ती देण्यात येईल.

- अजित गायकवाड, महाव्यवस्थापक, कर्मचारी वर्ग व औद्योगिक संबंध