esakal | कोरोनाचे नियम पायदळी, एसटीकडून यांत्रिक कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थितीचा आग्रह
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

कोरोनाचे नियम पायदळी, एसटीकडून यांत्रिक कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थितीचा आग्रह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात लॉकडाउन घोषित करताना शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के उपस्थितीची अट घालण्यात आली आहे. मात्र, त्याकडे काणाडोळा करीत एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीचा आग्रह धरला आहे. अगदी नगण्य फेऱ्या सुरू असतानाही सर्व यांत्रिक कर्मचाऱ्यांना बोलावण्यात येत असल्याने एसटी आगारात कोरोनाचा उद्रेक होण्याची धास्ती कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे. कामगार संघटनांनीही या प्रकारावर आक्षेप नोंदविला आहे.

हेही वाचा: सावधान! 'या' शहरात फक्त एक नव्हे तर ५ नवीन स्ट्रेन, लक्षणात बदल

एसटीतून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीच वाहतूक सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीतच सामान्यांना प्रवासाची परवानगी आहे. या निर्बंधामुळे प्रवासीच नसल्याने एसटीच्या मोजक्याच फेऱ्या सुरू आहेत. अख्खा नागपूर विभागात शुक्रवार व शनिवारी १० ते १२ बसेसद्वारे फेऱ्या करण्यात आल्या. दररोज ९० टक्क्यांहून अधिक फेऱ्या रद्द होत असतानाही यांत्रिक कर्मचाऱ्यांना मात्र पूर्ण क्षमतेने हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

वास्तविक महामंडळाने प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के उपस्थितीचे नियोजन करण्यास सांगितले आहे. कोणत्याही स्थितीत कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांच्यावर जाणार नाही याची काळजी घेण्यास बजावले आहे. आगार, विभागीय कार्यशाळेतील चालक, वाहक, कार्यशाळेतील यांत्रिक कर्मचाऱ्यांची गरजेनुसार नियोजनकरून ड्युटी लावण्याचे निर्देश आहेत. पण, नागपूर विभागाने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. विभागात आठ आगार व विभागीय कार्यशाळा आहे. प्रत्येक आगारात २० ते ४० यांत्रिक कर्मचारी असून विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या बसेसच जागेवर उभ्या असल्याने दुरुस्तीची गरजच नाही. यानंतरही सर्व कर्मचाऱ्यांना कामावर बोलविले जात आहे. परिणामी सोशल डिस्टंसिंगच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जात आहे. याप्रकारातून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने फैलावण्याची शक्यता कर्मचाऱ्यांमध्ये आहे. कर्मचाऱ्यांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ थांबवून यांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्याही नियंत्रित करावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार, विभागीय सचिव पुरुषोत्तम इंगोले यांनी केली आहे.

loading image