नागपूरकर विद्यार्थ्यांना प्रतीक्षा युद्ध संपण्याची

शिक्षणात अडथळा आल्याने मुलांसह पालकही चिंतित
Nagpur students waiting end ofrussia ukraine war
Nagpur students waiting end ofrussia ukraine war sakal

नागपूर : डॉक्टर बनून समाजसेवा करण्याच्या उद्देशाने नागपुरातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले. शिक्षणाची गाडी रुळावर धावत असतानाच अचानक युद्ध पेटले आणि जिवाच्या भीतीपोटी त्यांना शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले. ५० दिवस लोटूनही युद्ध सुरूच असल्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही सध्या कमालीचे चिंतेत आहेत. युद्ध केव्हा थांबेल, युक्रेनला केव्हा परत जायला मिळेल आणि उर्वरित शिक्षण पूर्ण होणार की नाही, असे विविध प्रश्न नागपूरकर विद्यार्थ्यांच्या मनात सध्या घोळत आहेत.

रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दैनिक ''सकाळ''ने युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या असता, बहुतांश मुले त्यांच्या भविष्याबद्दल काळजीत करताना दिसून आले. कीव विद्यापीठात एमबीबीएस करीत असलेली गणपतीनगर (झिंगाबाई टाकळी) येथील शिवांगी सिंग म्हणाली, माझे लहानपणापासूनच डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. मात्र, बारावीत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने भारतातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे २०१६ मध्ये युक्रेनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पप्पांनी (शिवमंगल सिंग) जवळची थोडीफार जमापुंजी व बँकेतून शैक्षणिक कर्ज घेऊन माझे ॲडमिशन केले. यंदा मी पाचव्या वर्षात शिकत आहे.

फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर युद्धाचे ढग गोळा होऊ लागल्यानंतर पालकांच्या सल्ल्यानुसार मी व माझ्या अन्य तीन-चार मैत्रिणी ॲडव्हायजरी जारी होण्यापूर्वीच १८ तारखेला मायदेशी परतलो. युक्रेनमधील काही शहरातील विद्यापीठे उध्वस्त झाली असली तरी, आमचे कीव विद्यापीठ अजूनही पूर्णपणे सुरक्षित आहे. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. शिक्षक बंकरमध्ये बसून क्लासेस घेत आहेत. मात्र ऑनलाइन आणि ऑफलाईन शिक्षणामध्ये खूप फरक जाणवतो. विशेष म्हणजे, प्रॅक्टिकल नॉलेजपासून सध्या आम्ही वंचित आहोत, जे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. त्यामुळे केव्हा एकदाच युद्ध संपते आणि आम्हाला परत युक्रेनला जाण्याची संधी मिळते, याची प्रतीक्षा करीत आहे. परिस्थिती लवकर सामान्य होईल, अशी आशा २६ वर्षीय शिवांगीने यावेळी व्यक्त केली.

रुहीलाही बसला युद्धाचा फटका

याच विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत असलेली दाभा येथील २३ वर्षीय रुही कोलतेसुद्धा शिक्षणात व्यत्यय आल्याने दुःखी व निराश झाली आहे. सेवानिवृत्त डॉक्टरची (डॉ. नरेंद्र कोलते) कन्या असलेली २३ वर्षीय रुही म्हणाली, मी २०१६-१७ मध्ये युक्रेनला गेले होते. एमबीबीएसचे आणखी एक वर्ष बाकी आहे. मीदेखील युद्ध आरंभ होण्यापूर्वीच नागपुरात परत आली. तेव्हापासून झूम तसेच गुगल मीटवरून ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. माझ्यासाठी हे वर्ष खूप महत्त्वाचे होते. खरं तर थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलची अधिक गरज होती. पण अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ते होऊ शकले नाही. युद्धामुळे आमच्या शिक्षणावर निश्चितच परिणाम झाला आहे. सर्व काही पुन्हा ठीकठाक होईल, अशी आशा तिने व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com