esakal | नाट्य संमेलनाच्या वारीतून नागपूरला डावलले
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur swept through the theater of drama

नाट्य संमेलनाच्या वारीतून नागपूरला डावलले

sakal_logo
By
राघवेंद्र टोकेकर

नागपूर : अखिल भारतीय नाट्य परिषदेचे शंभरावे संमेलन राज्यभर वारी काढून साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी यातून नागपूरला पूर्णपणे डावलण्यात आल्याचे कळते. विदर्भातही ही वारी फारसा प्रवास करणार नसून अमरावती आणि चंद्रपूरचा निर्णय गुरुवारी (ता.5) घेण्यात येणार आहे. या वृत्ताची नाट्यपरिषदेचे प्रवक्‍ते मंगेश कदम यांनी पुष्टी केली आहे.

अवश्य वाचा - हायजॅक विमानातून प्रवाशांची सुटका; पाच दहशतवाद्यांचा खात्मा

अखिल भारतीय मराठी नाट्‌य परिषदेच्या वतीने होत असलेल्य मराठी नाट्‌य संमेलनाचे यंदाचे शंभरावे वर्ष आहे. त्यामुळे हे केवळ आयोजन न राहता त्याला नाट्यवारीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न परिषदेकडून केला जात आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर (ता.25 मार्च) मराठी रंगभूमीचे जनक व्यंकोजी राजे यांच्या तंजावर येथील समाधी परिसरात नाट्यसंमेलनाची सुरुवात होईल. रंगभूमीदिनी (ता.27 मार्च) सांगली येथे शंभराव्या नाट्यसंमेलनाची नांदी वाजेल, तर मुंबई येथे 14 जून रोजी गो. ब. देवल यांच्या स्मृतिदिनी संमेलनाचा समारोप होईल, अशी घोषणा अ. भा. नाट्‌य परिषदेने केली आहे.

सांगली ते मुंबईदरम्यान होणारा 100व्या नाट्‌यसंमेलनाच्या वारीचा प्रवास वाया विदर्भ होणार असला तरी ही वारी नेमकी कुठून जाणार याबाबत साशंकता कायम आहे. विशेष म्हणजे 99 व्या अखिल भारतीय नाट्‌य संमेलनाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या स्थानिक नाट्‌यपरिषदेच्या शाखेने मध्यवर्ती शाखेला प्रस्तावच दिलेला नाही अशा चर्चा नाट्‌यविश्‍वात होत्या. मात्र, ज्या शहराला 99 व्या आयोजनाचा मान मिळतो त्या शाखेला प्रस्ताव देण्याची गरज पडणार नसल्याचे मत मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी व्यक्‍त केले. या आयोजनातून अनेक लहान गावांतील नाट्यरसिकांना प्रयोग पाहण्याची संधी मिळणार असून, संपूर्ण महाराष्ट्रात फिरणारी नाट्यसंमेलनाची ज्योत उपराजधानी नागपुरात यावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यवर्तीशाळेच्या नियामक समितीची 5 मार्च रोजी बैठक होणार असून, या बैठकीत स्थानांची निश्‍चिती होणार आहे.

चौकट

मराठवाडा, खानदेश व पश्‍चिम महाराष्ट्रात ज्या वेगाने मराठी नाट्य संमेलनाची तयारी सुरू आहे, त्याप्रमाणात विदर्भात झालेली नाही. यंदा होणारे शंभरावे मराठी नाट्य संमेलनान न भुतो न भविष्यती असेच करण्याचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचा ध्यास आहे. त्यामुळे आयोजनाचा खर्च मध्यवर्ती करणार की, नाट्यपरिषदेच्या स्थानिक शाखा याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.


पूर्ण प्रयत्न करणार : नरेश गडेकर

संपूर्ण महाराष्ट्रात फिरणारी शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्‌यसंमेलनाची ज्योत किमान दोन दिवसतरी नागपूरात यावी अशी प्रत्येक नाट्‌यप्रेमीची इच्छा आहे. हे आयोजन करण्याची नाट्‌यपरिषदेला इच्छा असून, ही ज्योत नागपूरला यावी यासाठी पूर्ण प्रयत्न करू.