नागपूरचा दिलीप करतोय सायकलने भारतभ्रमण

सामाजिक संदेशासह लिम्का व गिनेस बुकमध्ये नाव नोंदविण्याचा प्रयत्न
bicycle
bicyclesakal

नागपूर : एखादे लक्ष्य साध्य करायचे असेल तर त्याचे वेड असणे खूप गरजेचे असते. एक ध्येयवेडा आणि जिद्दी व्यक्तीच अशक्य गोष्टी सहज शक्य करून दाखवू शकतो. नागपूरचा सायकलपटू दिलीप भरत मलिक हा अशाच धेयवेड्यांपैकी एक. दिलीपने समाजातील विविध ज्वलंत विषयांकडे देशवासींचे लक्ष वेधण्यासाठी अनोखी भारतभ्रमण सायकल यात्रा सुरू केली आहे. या निमित्ताने तो सामाजिक संदेश तर देत आहेच, शिवाय प्रतिष्ठेच्या लिम्का व गिनेस बुकमध्येही नाव नोंदविण्याचा प्रयत्न करणार आहे.

महानगरपालिकेतील धरमपेठ झोनमध्ये स्वच्छता कर्मचारी असलेल्या दिलीपने गेल्या २६ जानेवारी रोजी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधीच्या पुतळ्यापासून ४५, ७१२ किमी अंतराच्या या महत्त्वाकांक्षी सायकल यात्रेला सुरवात केली होती. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, दिल्ली, उत्तरप्रदेश, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेशमार्गे २१,२५० किमीचा पहिला टप्पा ७ महिने ५ दिवसांत पूर्ण करून तो नुकताच उपराजधानीत परतला. नागपुरात सायकल दुरुस्त केल्यानंतर उद्या, गुरुवारी तो दुसऱ्या टप्प्यासाठी दक्षिण भारताकडे रवाना होणार आहे. या यात्रेदरम्यान तो दिवसरात्र सायकल चालवतो. सायकलवर तिरंगा झेंडा लावून व पाठीवर १५ किलोचे ओझे घेऊन मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, ढाबा किंवा मिळेल त्या ठिकाणी जेवण व विश्रांती घेऊन पुढील प्रवासाला सुरवात करतो. उर्वरित तीन टप्प्यांमध्ये भारतातील इतर राज्ये कव्हर करणार असल्याचे त्याने सांगितले. एकूण चार टप्प्यात होणारी ही सायकल यात्रा १३ ते १५ महिन्यांत पूर्ण करून ३१ मार्च २०२३ पर्यंत नागपूरला परतण्याचा दिलीपचा प्रयत्न आहे.

५१ वर्षीय दिलीप या सायकल यात्रेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासह झाडे लावा, झाडे जगवा, स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ इत्यादी संदेश देत आहे. शिवाय भारतीयांना निरोगी व फिट राहण्याविषयी जागरूक करीत आहे. यात्रेच्या निमित्ताने ''लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'' आणि ''गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स''साठी तो प्रयत्न करणार आहे. यासाठी त्याने यापूर्वीच रजिस्ट्रेशन केले आहे. या सायकल यात्रेत दिलीपसोबत पुण्याच्या दोन मुली व औरंगाबादचा एक सायकलपटूही होता. मात्र त्यांनी अर्ध्यातूनच सायकल यात्रा सोडून दिली.

त्यामुळे आता दिलीप एकटाच ही यात्रा पूर्ण करणार आहे. या यात्रेदरम्यान दिलीपला अनेक आव्हाने व संकटांचा सामना करावा लागत आहे. एक-दोन वेळा तो मरता-मरताही वाचला. पण तरीही जिद्दीने पुढे जात संकल्प सिद्धीस नेण्याचा तो प्रयत्न करीत आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून सायकल चालवित असलेल्या दिलीपने गेल्या तीन दशकांमध्ये अनेकवेळा सायकलने अख्खा देश पिंजून काढलेला आहे. लेह लद्दाखपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून कोलकातापर्यंत सायकलने भारतभर अनेक मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. सायकलपटूशिवाय तो एक दर्जेदार ऍथलिटसुद्धा आहे. प्रौढांच्या अनेक मैदानी स्पर्धांमध्ये त्याने मेडल्स, ट्रॉफीज व रोख पुरस्कार जिंकले आहेत.

मदतीसाठी केले दानशूरांना आवाहन

सायकल यात्रेत दिलीपची आतापर्यंतची जमापुंजी खर्च झाली. या प्रवासादरम्यान त्याची अनेकवेळा सायकल खराब झाली. नादुरुस्त सायकलमुळेच तो दोन दिवसांपासून नागपुरात अडकला आहे. यात्रेसाठी मदत मिळावी म्हणून त्याने मनपा व क्रीडा मंत्र्यांसह अनेकांकडे हात पसरले. पण कुणीही आपली मदत केली नसल्याचे दुःख त्याने बोलून दाखविले. दानशूरांनी मदतीचा हात दिल्यास उर्वरित सायकलयात्रा पूर्ण करायला खूप मदत होईल, असे त्याचे म्हणणे आहे. इच्छुकांनी एसबीआय, महाल शाखेतील २०२३९३०४१७९ या अकाऊंट नंबरमध्ये (IFSC : SBIN0002161) पैसे टाकून सहकार्य करावे, असे आवाहन त्याने केले. (दिलीपचा संपर्क क्र. ९३७२३८८४४८).

पर्यावरण संवर्धनासाठी रोज चालवा सायकल

पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत असलेला ऱ्हास मानवी जीवनासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे झाडे लावणे व जगविण्यासोबतच प्रदूषण कमी करणेही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी दैनंदिन जीवनात पेट्रोल वाहनांचा वापर कमी करून सायकलवर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. गोरगरिबांसोबतच श्रीमंतांनीही मनाची तयारी दाखवून सायकलीला आयुष्यातील अविभाज्य घटक बनविल्यास पर्यावरण संवर्धनास फार मोठी मदत होऊ शकते. वर्तमानासोबतच भावी पिढीचेही भविष्य अंधःकारमय होण्यापासून वाचू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com