नागपूर : तलावात विषारी ‘स्पेंट वॉश’ पाझरल्याने दोन टन मासे मृत्युमुखी

महागाव तालुक्यातील शिरपूर शिवारातील घटना; नुकसानभरपाईची मागणी
Nagpur Two tone fish death
Nagpur Two tone fish deathsakal

महागाव : एका कंपनीने शिरपूर शिवारात फेकलेले विषारी स्पेंट वॉश हे रसायन पावसाच्या पाण्यासोबत शेतातील तलावात पाझरल्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले. या घटनेमुळे शेतकऱ्‍याचे सात लाखांवर नुकसान झाले. शेतकरी गौरव राजीव पाटील (रा. शिरपूर) यांनी तहसील आणि पोलिस प्रशासनाकडे याबाबत तक्रार दिली असून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

गौरव पाटील यांनी शिरपूर येथील आपल्या शेतात मत्स्यतलावाची निर्मिती केली आहे. जवळच असलेल्या गुंज येथील एका कारखान्यातील स्पेंट वॉश हे विषारी रसायन शिरपूर शिवारात, नाल्यात व डोंगराळ भागात टँकरद्वारे टाकण्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारीसुद्धा केल्या आहेत.

त्यानंतर उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड आणि तहसीलदार विश्वंभर राणे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली होती. शिवाय स्पेंट वॉशमुळे प्रदूषित झालेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी गोळा केले होते. त्याबाबत कारवाईची प्रतीक्षा असताना या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे साचलेले स्पेंट वॉश वाहत येऊन तलावात झिरपले. या विषारी द्रव्याच्या प्रभावाने गौरव पाटील यांच्या मत्स्य तलावातीत दोन टन मासे तडफडून मरण पावले.

विशेष म्हणजे, या विषाच्या प्रभावाने पुढील दोन वर्षे मत्स्य उत्पादन घेता येणार नाही. त्यामुळे या शेतकऱ्यायास वीस लाखांवर नुकसान सोसावे लागू शकते. कंपनीच्या हिटलरशाहीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून प्रकल्पावर कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी गौरव पाटील यांनी केली आहे.

स्पेंट वॉशच्या नमुन्यांचे काय झाले?

परिसरातील शेतशिवारात फेकलेल्या स्पेंट वॉशबाबत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. १ जून रोजी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली व विहीर आणि नाल्याच्या प्रदूषित पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेकडे पाठविणार असल्याचे सांगितले होते. त्या नमुन्यांचे काय झाले व कारवाई नेमकी कोठे अडली, याबाबत शेतकरी शंका उपास्थित करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com