esakal | प्रसूती होणार वेदनारहित अन् सुरक्षित, नागपुरातील तरुणांनी शोधले भन्नाट उपकरण

बोलून बातमी शोधा

pregnancy

प्रसूती होणार वेदनारहित अन् सुरक्षित, नागपुरातील तरुणांनी शोधले भन्नाट उपकरण

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : प्रसूतीवेदना कमी करण्यासह सुरक्षित प्रसूतीसाठी सहायक ठरणाऱ्या उपकरणाची निर्मिती अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थांनी मिळून केली आहे. या यंत्राच्या मदतीने अनेक जटिल प्रकरणांमध्येही प्रसूतीसाठीची शस्‍त्रक्रियाही टाळली जाऊ शकते. वैद्यकीय कसोट्यांवर या उपकरणाची उपयोगिता तपासण्यात आली असून उपकरणाचे पेटंट मिळविण्यातही या युवकांना यश आले आहे.

हेही वाचा: बाबू होणार शिपाई, पदोन्नतीचा आनंद फक्त महिनाभरच

बाळंतपणाच्या वेळी शारीरिक गुंतागुंत निर्माण झाल्यास वेदना अधिकच वाढतात. अशावेळी डॉक्टरांकडून सिजेरियनचा सल्ला दिला जातो. पण, शस्‍त्रक्रिया अधिक वेदनादायी ठरते. या वेदना कमी करण्याचा ध्यास घेत वानाडोंगरी येथील यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिक अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी कुशाग्रकुमार नंदकिशोर वंजारी आणि काजल रवींद्र रॉय यांचे प्रयत्न सुरू होते. अंतिम वर्षात याच प्रकल्पाची निवड करीत संशोधन सुरू केले. महत्प्रयासानंतर उपकरण तयार करण्यात यश आले. या यंत्राच्या मदतीने नैसर्गिक प्रसूती अधिक सुकर होईलच. सोबत गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्येही शस्‍त्रक्रिया टाळणे शक्य होऊ शकणार आहे. कोणत्याही कारणाने ३ ते ६ महिन्यांचा गर्भ काढायचा झाल्यास हे कार्यही सहज आणि वेदनामुक्त पद्धतीने करता येऊ शकेल. नंदकिशोर आणि काजल यांनी प्राध्यापक डॉ. संदीप खेडकर यांचे तांत्रिक मार्गदर्शन व सावंगीच्या ओबीजीवाय जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक डॉ. अर्पिता जयस्वाल-सिंघम यांचे वैद्यकीय मार्गदर्शन लाभले असून डॉ. पुनीत फुलझेले यांनी प्रकल्प समन्वयक म्हणून सहकार्य केले. या उपकरणाला पेटंट मिळाले असून अधिक प्रमाणात उपकरणांची निर्मिती झाल्यास किंमत कमी होऊन अधिकाधिक त्याचा उपयोग करणे शक्य होईल.

हेही वाचा: धक्कादायक! नागपुरात महिनाभरात तब्बल २२८२ कोरोनाबळी; ग्रामीण भागातही रुग्णसंख्या अधिक

उपकरणाची उपयोगिता

  • कॅथेटर ग्रीवामध्ये घातला जातो.

  • सलाइन कॅथेटरमधून जाते आणि ग्रीवाच्या आत कॅथेटरला अँकर करण्यासाठी बलून फुगवते

  • प्रक्षेपण रॉड मार्गदर्शक ट्यूबमधून सुरक्षित आणि सावधगिरीने आत जाते.

  • मार्गदर्शक ट्यूबमध्ये प्रसार रॉड टाकल्यानंतर पाकळ्या हळूहळू उघडण्यास सुरुवात होते.

  • प्रक्षेपण रॉड फ्लॅक्सला बाहेरून ढकलतो आणि विघटन प्रक्रिया सुरू होते.

  • हळूहळू प्रसार रॉड बाहेर काढून फ्लॅप्स त्यांच्या मूळ स्थितीत आणले जाते.

  • गर्भाशय ग्रीवाच्या बाहेर हळूहळू जागा तयार करून फुगलेला बलून बाहेर काढला जातो.