नागपूर : जिल्हा परिषदेतही बंडखोरी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Zilla Parishad Election

नागपूर : जिल्हा परिषदेतही बंडखोरी?

नागपूर : शिवसेना आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असताना नागपूर जिल्हा परिषदेतही बंडाचे वारे वाहू लागले आहे. सत्तापक्षातील एका सदस्याने उघडपणे अध्यक्षपदावर दावा केला आहे तो नाकारल्यास सहकाऱ्यांसोबत घेऊन बाहेर पडू, असा इशारा दिला आहे. संबंधित अध्यक्षपदाचा दावेदाराने विरोधकांसोबत चर्चा चालू असून याची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेतील कॉंग्रेसप्रणित महाविकास आघाडीची सत्ता आहे. कॉंग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे. पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पुढील महिन्यात दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. सर्वांच्या नजरा या अध्यक्ष पदाच्या आरक्षणाकडे लागल्या आहे.

आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होण्याची दाट शक्यता असल्याने इच्छुकांनी पद मिळविण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे. काहींनी तर विशिष्ट पदावरच दावा केला आहे. कामठी विधानसभा मतदार संघातील एका सदस्याने अध्यक्ष तर उमरेड मतदार संघातील एका सदस्याने उपाध्यक्ष पदावर दावा केला आहे.

अध्यक्षपदाचा दावा करणारे सदस्य ज्येष्ठ असून त्यांनी उघडपणे आपली मंशा व्यक्त करून दाखविली आहे. अध्यक्ष पद सर्वसाधरण प्रवर्गासाठी राहिल्यास निवडणुकीत अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कॉंग्रेसमधील काही सदस्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. विरोधी पक्षाच्या (भाजप) सदस्यांसोबतही चाचपणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे काही सदस्य नाराज आहे. त्यांनाही हाताशी धरण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. गेल्या अर्थसंकल्पीय सभेत त्यांनी सत्तापक्षालाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

सात ते आठ काँग्रेस सदस्यांना जोडण्याचा प्रयत्न

जिल्हा परिषदेत ५८ सदस्य आहेत. त्यामुळे बहुमतासाठी २९ चा आकडा हवा. कॉंग्रेसकडे ३२ सदस्य तर भाजपकडे १४ सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे ८ तर शिवसेना, गोंडवाणा व शेकापचे एक-एक सदस्य आहेत. एक अपक्ष सदस्य आहे. राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांचे समर्थन मिळणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ता उलटवण्यासाठी कॉंग्रेसमधील ७ ते ८ सदस्यांना बाहेर काढावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Nagpur Zilla Parishad Election Shiv Sena Member Mva

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top