नालसाहेब चौकात इंग्रजांकडून झाला होता बेछूट गोळीबार

संदेश धडकला अन् सारेच पेटून उठले!
स्वातंत्र्यसैनिक पुंजाराम समरित
स्वातंत्र्यसैनिक पुंजाराम समरितsakal

नागपूर : १९४२ मधील ‘चले जाव’ भारतीय स्वातंत्र्य समरातील एक ऐतिहासिक आंदोलन होते. त्यावेळी देशभरातील लोक इंग्रजांविरुद्ध पेटून उठले होते. नागपुरातही तीव्र आंदोलन झाले होते. इंग्रजांच्या अत्याचाराचा विरोध करण्यासाठी त्यावेळी ‘करा किंवा मरा’ असा संदेश नागपुरात येऊन धडकताच लहानमोठ्यांसह सारेच पेटून उठले होते. हंसापुरी येथील नालसाहेब चौकात इंग्रज सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकांमध्ये संघर्ष उडला.यामध्ये स्वातंत्र्यसैनिक पुंजाराम समरित यांना वीरमरण आले.

चौथीपर्यंत शिकलेले शहीद पुंजाराम समरित हे मूळचे मौदा गावचे. १९४२ साली एम्प्रेस मिलमध्ये नोकरी करीत असताना ते हंसापुरी येथील गेंदलाल कातुरे यांच्या घरी किरायाने राहात होते. इंग्रजांना भारतातून हुसकावून लावण्यासाठी देशभर तीव्र आंदोलन सुरू होते. ‘करा किंवा मरा’ असा संदेश आल्यानंतर नागपुरातही मगनलाल बागडी यांनी स्थापन केलेल्या ‘हिंदुस्थानची लालसेना’तर्फे १२ ऑगस्ट रोजी नालसाहेब चौकातील रस्त्यावर आंदोलन सुरू झाले. यावेळी इंग्रज पोलिस दिसेल त्याच्यावर लाठीमार करीत होते.

पोलिसांना रोखण्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी सिमेंटचे मोठमोठे पाइप टाकण्यात आले होते. मात्र, या अडथळ्यांना न जुमानता इंग्रज सैनिकांनी आंदोलनकर्त्यांकडे धाव घेत बेछूट गोळीबार केला.

१४ ऑगस्ट रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आपल्या सहकाऱ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पुंजाराम समरित यांच्या उजव्या हाताला गोळी लागली. ते जखमी अवस्थेत खाली कोसळले. लगेच काही सहकाऱ्यांनी त्यांना उचलून घरी आणले. मोहल्ल्यातील डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचार सुरू असतानाच अचानक इंग्रज सैनिकांनी घराला वेढा घातला. त्यावेळी काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र, जखमी असल्याने समरित पकडल्या गेले. नंतर त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. जवळपास २० दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर ४ सप्टेंबर रोजी त्यांचे अवघ्या २४ व्या वर्षी उपचारादरम्यान मेयो रुग्णालयात निधन होऊन ते देशासाठी शहीद झाले. या घटनेनंतरही अनेकांनी भूमिगत राहून स्वातंत्र्याची चळवळ सुरूच ठेवली. कालांतराने देश स्वतंत्र झाला आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशभर स्वातंत्र्याचा प्रचंड जल्लोष सुरू झाला.

नालसाहेब चौक झाला शहीद पुंजाराम चौक

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पुंजाराम समरित यांच्या सन्मानार्थ नालसाहेब चौकाला शहीद पुंजारामजी समरित चौक’ असे नाव देण्यात आले. त्यांची ही ओळख आजही कायम आहे. याशिवाय गांधीसागर येथील हुतात्मा स्मारकावर सुद्धा त्यांचे नाव कोरण्यात आले आहे. स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ १९७४ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीही सन्मानपत्र दिले होते. केंद्र सरकारनेही शहीद पुंजाराम यांना सन्मानित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com