esakal | राष्ट्रवादीत अस्वस्थता! अहीरकर, पवार गॅसवर; प्रन्यासचा विश्वस्त कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीत अस्वस्थता! अहीरकर, पवार गॅसवर; विश्वस्त कोण?

राष्ट्रवादीत अस्वस्थता! अहीरकर, पवार गॅसवर; विश्वस्त कोण?

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : महिनाभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अनिल अहीरकर आणि जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार नागपूर सुधार प्रन्यासवर आपली नियुक्ती केव्हा होईल याची प्रतीक्षा करीत आहेत. दोघांनाही वेगवेगळ्या नेत्यांनी शब्द दिल्याचे समजते. मात्र, कोणाचेच नाव जाहीर केले जात नसल्याचे सर्वच अस्वस्थ आहेत.

महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीने विदर्भात पक्षाचा विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू केले. खासकरून राज्याच्या उपराजधानीवर त्यांनी लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांच्यावर पक्षाने विस्ताराची जबाबदारी सोपविली. त्यांनी खास विश्वासू माजी आमदार राजू जैन यांना नागपूरचे समन्वयक म्हणून नेमले. त्यांनी नव्यानव्या सक्रिय कार्यकर्त्यांना हेरणे सुरू केले.

हेही वाचा: शेगाव : श्रींचा १११ वा ऋषीपंचमी सोहळा होणार भक्तांविनाच

आक्रमक आंदोलक म्हणून प्रशांत पवार यांना पक्षात आणले. सुरुवातीला त्यांना शहराध्यक्ष केले जाईल अशी चर्चा होती. मात्र, नगरसेवक दुनेश्वर पेठे यांना शहराध्यक्ष करून पक्षाने जुने कार्यकर्ते नाराज होणार नाही याची दक्षता घेतली. अनिल अहीरकर यांना शहराध्यक्षपदावरून हटविण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांना रुचला नाही. त्यामुळे अहीरकरांना मोठे पद मिळण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांची खास मर्जी असल्याचे समजते. त्यामुळे प्रन्यासच्या विश्वस्त पदासाठी त्यांचे नाव प्राधान्याने घेतले जात आहे. दुसरीकडे जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनाही शब्द दिल्याचे सांगण्यात येते. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात ते राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यांनाही विश्वस्त म्हणून नेमले जाईल असा विश्वास वाटत आहे.

हेही वाचा: गणपतीच्या नेवैद्यासाठी अशी बनवा मोदकाची उकड

सुधार प्रन्यासचा विश्वस्त होल्डवर

ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे आणि माजी उपमहापौर तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. सावरबांधे यांनी निवडणूक लढणार नाही, असे जाहीर केले आहे. असे असले तरी सर्वांना बांधून ठेवण्यासाठी काही महत्त्वाची पदे देणे आवश्यक आहे. आणखी काही अनुभवी व जुनेजाणते व दुखावलेले राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. विश्वस्त नेमल्यास येणाऱ्यांचा ओघ आटण्याची भीती असल्याने सुधार प्रन्यासचा विश्वस्त होल्डवर ठेवल्याचे समजते.

loading image
go to top