विदर्भात मोठा भाऊ कसे व्हायचे; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सवाल, नियुक्त्या रखडल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

विदर्भाकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादी ‘मोठा भाऊ’ कसा होईल?

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे बुधवारी (ता. १७) येणे निश्चित झाले आहे. तरी नागपूर जिल्ह्याचा संपर्क मंत्री अद्याप नेमण्यात न आल्याने आता आणखी कोणाची प्रतीक्षा केली जात आहे, असा सवाल राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्यावतीने उपस्थित केला जात आहे.

महाविकास आघाडीच्या स्थापनेला जवळपास दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आघाडीच्या निर्मितीपूर्वी शरद पवार तीन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी अतिवृष्टी गावांची पाहणी केली, शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यांचे सारथ्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. आघाडीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादीने विदर्भात विस्तार करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल पटेल यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. त्यांनी बैठका आणि सभांचा धडाका लावला होता.

हेही वाचा: ग्रीन मोनोकनी बिकनीमध्ये अनुष्काचा फोटो पाहून विराट म्हणाला...

आपले खास समर्थक राजेंद्र जैन यांना नागपूर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून नेमले. मात्र, अल्पवधीतच राष्ट्रवादीचा उत्साह मावळला. मध्यंतरी कोरोनामुळेसुद्धा सर्व कार्यक्रमांना ब्रेक लागला होता. ही सर्व गडबड सुरू असतानाच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याने राष्ट्रवादीचे नेतेही इतर नेत्यांनीही विदर्भाकडे फिरकणे कमी केले. जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत तर उमेदवारांना वाऱ्यावर सोडण्यात आले होते. या सर्व भानगडीत नागपूर जिल्ह्याचा संपर्क मंत्रीही राष्ट्रवादीने नेमला नाही.

संपर्क मंत्री केव्हा नेमणार

संपर्क मंत्री नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नियुक्त्या रखडल्या आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेने नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हा नियोजन समितीसह इतर शासकीय समित्यांवर आपले प्रतिनिधी नेमले. त्यांनी कामेही सुरू केली आहेत. महापालिका निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाही वारंवार मागणी करूनही राष्ट्रवादीतर्फे संपर्क मंत्री नेमला जात नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील तब्बल ९० कार्यकर्ते समित्यांपासून वंचित आहेत. विदर्भाकडे असेच दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादी ‘मोठा भाऊ’ केव्हा होईल, असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. या संदर्भात शरद पवार यांना निवेदन देऊन त्यांचे याकडे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

loading image
go to top