esakal | राष्ट्रवादी आता दुय्यम भूमिका स्वीकारणार नाही, पटेलांचा काँग्रेसला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

praful patel

राष्ट्रवादी आता दुय्यम भूमिका स्वीकारणार नाही, पटेलांचा काँग्रेसला इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : काँग्रेसच्या (congress) आग्रहाखातर आजवर राष्ट्रवादीने (ncp) नागपूर व विदर्भात दुय्यम भूमिका घेतली. मात्र, आता हे खपवून घेणार नाही असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल (NCP MP Praful patel) यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला एकप्रकारे इशाराच दिला. सोबतच चार रस्ते आणि दोन पूल बांधून विकास होत नसतो असे सांगत त्यांनी भाजपलाही धारेवर धरले. (ncp mp praful patel statment about party expansion in nagpur)

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलला पर्याय : गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वर्धमाननगर येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार प्रकाश गजभिये, प्रशांत पवार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेंद्र तिवारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यातील आघाडी सरकार शरद पवार यांच्यामुळेच स्थापन झाले आहे. ते महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नेते आहेत याकडे लक्ष वेधून कोणाचेही नाव न घेता पटेल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला.

मिहानचा एक इंचही विकास नाही -

सात वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे. पाच वर्षे महाराष्ट्रातही सत्ता होती. मात्र, मिहानचा एक इंचही विकास झाला नाही. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मिहानसाठी यशवंत स्टेडियम येथे ५० हजार लोकांना बोलावले होते. त्यावेळी त्यांनी मिहानमध्ये अमुक करू, तमुक करू, युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असे आश्वासन दिले होते. त्याचे आज काय झाले ते आपण बघत आहोत. एकही नवीन उद्योग येथे सुरू झाला नाही. जे उद्योजक आले होते सोडून गेले. चार रस्ते आणि दोन मेट्रो लाइन झाल्याने शहराचा विकास होत नसतो. उद्योगधंदे सुरू होऊन तरुणांच्या हाताला काम द्यावे लागते. व्यापार, व्यवसाय वाढीस लागणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने नागपूरचा विकास होणार नाही आणि विदर्भातील युवकांना रोजगार मिळणार नाही. येथील युवकांना शहर सोडून गुडगाव, मुंबई, पुण्याला नोकरीसाठी जावे लागत आहे. याला नागपूरचा विकास म्हणता येणार नाही, असे पटेल म्हणाले.

राष्ट्रवादीसाठी प्रदेश प्रभारी महत्त्वाचे -

स्थानिक नेते काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही. काँग्रेस प्रमुखांचे प्रतिनिधी असलेले महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांच्या वक्तव्याला आम्ही महत्त्व देतो. ते हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून बोलतात, असे वक्तव्य करीत पटेल यांनी नाव न घेता नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. एच.के. पाटील, विधिमंडळातील पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात व मंत्री अशोक चव्हाण यांनी तीन दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत पटोले नव्हते. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले, याचा अर्थ काय, इशारा समजून घ्या, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. शरद पवार महाविकास आघाडीचे जनक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचे काम चालले आहे, असे पटेल यांनी सांगितले. आघाडीतील काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे जयंत पाटील व अजित पवार, सेनेचे सुभाष देसाई व एकनाथ शिंदे यांनी मंडळ, महामंडळ, नागपूर सुधार प्रन्याससह अन्य संस्थांमधील नियुक्तीचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. त्यानुसार नियुक्त्या करण्यात येतील,असे पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

loading image