दारु पार्टीत पैशांवरून वाद, वर्ध्यात वृद्धाची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 burned alive

दारु पार्टीत पैशांवरून वाद, वर्ध्यात वृद्धाची हत्या

आर्वी : क्षुल्लक कारणावरून झालेला वाद विकोपाला गेल्याने तिघांनी वृद्धाला जिवंत जाळले. यात वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आर्वी तालुक्यातील नांदपूर येथे सोमवारी (ता. २८) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. अभिमान पखाले (वय ६७) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादामुळे अभिमान पखाले यांनी महिन्याभरापूर्वी घर सोडले होते. ते गावातील बबलू मारोती पखाले यांच्या घरी काम करून राहत होते. दरम्यान, आज मारोती पखाले यांच्या घरी दारूच्या पार्टीचे आयोजन केले होते. दरम्यान, पैशाच्या कारणावरून झालेल्या वादात प्रमोद दाहट, मारोती पखाले, धर्मा पखाले यांनी अभिमान पखाले यांचा खून करून मृतदेह जाळला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा येथे पाठविला.

या प्रकरणी आर्वी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांनी संशयित प्रमोद दाहट, मारोती पखाले, धर्मा पखाले यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे करीत आहेत.

जाळून मारले की मारून जाळले?

नांदगाव येथे पखाले यांच्या घरी मिळालेला मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आला. त्यांनाला जाळून मारले की मारून जाळले, हे अद्याप अस्पष्ट आहे. नेमके काय हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळू शकेल, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त

वृद्धाला जाळून मारल्याच्या या घटनेने गावात खळबळ माजली आहे. पुन्हा कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

''पैशाच्या कारणावरून झालेल्या वादात हा खून करण्यात आला आहे. जाळून मारले की मारून जाळले, हा तपासाचा भाग आहे. घटनास्थळी केलेल्या पाहणीवरून प्रथम गळा दाबून खून करण्यात आला. त्यानंतर आत्महत्या दाखविण्यासाठी त्याला जाळण्यात आले असावे, असे दिसून येत आहे.''

-यशवंत सोळंखी, अपर पोलिस अधीक्षक वर्धा