esakal | 'मास्क घातला नसेल तरी पोलिसांना मारण्याचा अधिकार नाही, मनोज ठवकरची हत्याच'
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

'...तर पोलिसांना मारण्याचा अधिकार नाही, मनोज ठवकरची हत्याच'

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : मनोज ठवकरने (manoj thavkar death case nagpur) फक्त मास्क घातला नव्हता. मास्क न घालणे हा दंडाचा गुन्हा आहे. त्याच्यावर दंड आकारायला पाहिजे होता. मात्र, पोलिसांना त्याला अमानुष मारहाण केली. मास्क न घातल्यामुळे कोणाला मारण्याचा अधिकार पोलिसांना नाही. अशाप्रकारे तुम्ही सामान्य माणसाला मारत असाल तर ही हत्या आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) म्हणाले. आज त्यांनी मृत मनोज ठवकरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. (opposition leader devendra fadnavis visit to family of dead manoj thavkar)

हेही वाचा: सावधान! पोलिसांना fake call केल्यास होणार गुन्हे दाखल

मनोज ठवकर प्रकरणात पोलिस आयुक्तांनी तत्काळ सीआयडी चौकशीचे आदेश दिले ही चांगली गोष्ट आहे. मात्र, त्या पोलिसांना निलंबित करणे गरजेचे आहे. त्यांची बदली करून चालणार नाही. कोरोनाकाळात चूक कोणीच करू नये. पण, सामान्य माणसाने केलेली चूक आणि पोलिसांनी केलेली चूक यात फरक आहे. तुमच्याकडे लायसन्स नसेल तर तुम्ही त्याच्यावर चालान फाडू शकता. मात्र, त्या व्यक्तीला पोलिस लाठ्यांनी मारहाण करत असेल तर हे चुकीचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण? -

दुचाकीस्वार पोलिस वाहनावर धडकल्यानंतर संतापलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला जबर मारहाण केली. पोलिसांच्या मारहाणीत त्या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. मनोज ठवकर (शारदानगर) असे मृत युवकाचे नाव होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पारडी परिसरातील भवानी मंदिराजवळ पोलिसांची नाकेबंदी होती. याचदरम्यान दुचाकीस्वाराने एका पोलिस उपनिरीक्षकाला धडक दिली. त्यामुळे तेथील तैनात पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. पोलिस दुचाकीस्वाराला घेऊन पारडी पोलिस स्टेशनमध्ये गेले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. याचदरम्यान भोवळ येऊन दुचाकीस्वार खाली कोसळला. पोलिसांनी लगेच त्याला भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेचे वृत्त दुचाकीस्वाराचा नातेवाइक व परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचले. मृताचे नातेवाइक व नागरिकांनी पोलिस स्टेशनला घेराव घातला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी पारडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले. शीघ्र कृती पथकाचे जवान व दंगल विरोधी पथकालाही प्राचारण करण्यात आले होते.

loading image