होण्यापूर्वीच ओळखा येईल मुख कर्करोग; नागपूरच्या तरुणाचे संशोधन

Oral cancer can be diagnosed before it occurs
Oral cancer can be diagnosed before it occurs

नागपूर : तोंडात फोड आला किंवा जखम झाली. हळूहळू वाढतच गेली. डाॅक्टरकडे गेलात. ते सांगतात, ‘तोंडाचा कॅन्सर आहे.’ मग पायाखालची वाळू सरकते. त्यानंतर होणाऱ्या चाचण्या आणि उपचार अत्यंत वेदनादायी आणि खर्चिक असतात. अरेरे, आता खूप उशीर झाला, एवढीच सहानुभूती नातेवाईकांकडून मिळते... आणि चार-सहा महिन्यांपूर्वी भला-चंगा असलेला माणूस जग सोडून अकाली निघून जातो.

मुख कर्करोग (ओरल कॅन्सर) या अत्यंत घातक आजारामुळे दरवर्षी महाराष्ट्रात अंदाजे दहा लाख लोक मृत्युमुखी पडतात. ‘कर्करोग आहे’, हे निदान करण्यातच विलंब होतो. थेट तिसऱ्या-चौथ्या स्टेजवर निदान होते. तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. कर्करोग तुमच्या शरीरात घर करण्यापूर्वीच त्याची चाहूल लागली तर पुढील सर्व वेदना थांबवता येतील. नागपूरच्या एका झपाटलेल्या २७ वर्षाच्या तरुणाने यासाठी एक तपासणी पद्धत विकसित केली आहे. देशातील ही एकमेव पद्धती आहे, असा त्याचा दावा आहे.

सुभेंद्र सिंग ठाकूर हा तो तरुण. त्याच्या आईच्या आजारामुळे तो अक्षरशः कोलमडून गेला. त्याच्या असे लक्षात आले की, आजारी झाल्यावरच निदान आणि उपचाराची व्यवस्था आहे. परंतु, आजाराचा प्रवेश शरीरात होऊच दिला नाही; लागण होण्यापूर्वीच किंवा होताक्षणीच त्याला पकडता आले तर... मग पुढील सर्व प्रक्रिया त्रासदायक राहणार नाहीत.

अथक अभ्यास, परिश्रम आणि संशोधनातून त्याने एक पद्धत विकसित केली. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटेनेनेही त्याच्या या पद्धतीला प्रमाणित केले आहे. ‘कोणतीही जखम, फोड, व्रण नसला किंवा जराही त्रास नसला तरी ही पद्धती मुख कर्करोगाचे अचून निदान करू शकते’, असा दावा सुभेंद्र सिंग ठाकूरने ‘सकाळ’सोबत बोलताना केला.

मानसिकता बदलाल

‘चलता है ही मानसिकताच आजाराला निमंत्रण देते. मानवी शरीरावर आजार आघात करणारच. आजाराचे ते कामच आहे. परंतु, मारा होताच तत्क्षणी आपल्याला आजार का पकडता येत नाही? आजारी पडल्यावरच उपचार करण्याची मानसिकता का आहे? कर्करोगाच्या बाबतीत ही मानसिकता अत्यंत धोकादायक आहे. माझ्या आईच्या किडनी-आजाराचे उशिरा निदान झाले. तेव्हा माझे कुटुंब हादरून गेले. तेव्हाच मी अर्ली डिटेक्शनवर संशोधन करायला लागलो. त्यातून मी मुख कर्करोगाचे खूपच आधी निदान करण्याची पद्धती शोधून काढण्यात यशस्वी झालो. मुख कर्करोग होणार, हे तुमचे शरीर इशारा देत असते. तेच मी शोधून काढले आहे’ अशी माहिती सुभेंद्र सिंग ठाकूरने दिली.

काय आहे ही पद्धती?

ऑर्डर केल्यावर एक कलेक्शन किट घरपोच मिळते. त्यात सकाळी उठल्यानंतरची लाळ जमा करायची. काॅल केल्यावर प्रतिनिधी घरी नेण्यासाठी येणार. प्रयोगशाळेत त्याची तपासणी केल्यावर रिपोर्ट घरपोच मिळणार. सोबतच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्लाही मिळणार. यात तोंडाला कोणतीही जखम करण्याची गरज नाही. पारंपारिक पद्धतीच्या चाचणीसाठी किमान २५ हजाराच्या वर खर्च येतो. यात दहा पटीने खर्च कमी येतो.

आपली चाचणी करूनच घ्यायला हवी
खर्रा, तंबाखू, गुटखा आदी तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांनी तर आपली चाचणी करूनच घ्यायला हवी. त्रास किंवा लक्षणे असो वा नसो. आज आजार नसला तरी आजार होण्याची किती रिस्क आहे, हे या चाचणीतून कळते. मुख कर्करोगामुळे होणारे नुकसान नक्कीच टाळता येऊ शकते.
- सुभेंद्र सिंग ठाकूर,
संस्थापक आणि सीईओ, अर्लीसाइन (क्युरो बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड), नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com