Nagpur : नागपुरात प्रथमच झाले हृदयक्रिया थांबल्यावर अवयवदान

महाराष्ट्रातील पहिले तर देशातील तिसरे प्रत्यारोपण
nagpur
nagpursakal

नागपूर : ब्रेनडेड व्यक्तीचे अवयव प्रत्यारोपण करताना तज्ज्ञांकडे शस्त्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळतो. पण हृदयक्रिया बंद पडल्यानंतर रुग्णाचे अवयवदान करणे कठीण असते. मात्र ही अशक्यप्राय अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. हृदयक्रिया थांबत असल्याचे निदर्शनाच येताच तिच्यावर शस्त्रक्रिया करून किडनीच्या प्रतिक्षेत असलेल्या दोन व्यक्तींच्या शरीरात तिच्या किडनी प्रत्यारोपित करण्यात एम्सच्या डॉक्टरांना यश आले. हृदयातील रक्तप्रवाह बंद पडत असताना झालेले हे महाराष्ट्रातील पहिले तर देशातील तिसरे अवयव प्रत्यारोपण ठरले.

हृदयाची स्पंदने बंद पडताना अवयवदान करणाऱ्या सत्तेचाळीस वर्षीय महिलेचे नाव लीना विनोद काकडे असे आहे. अयोध्यानगर येथील रहिवासी लीना यांचा २९ नोव्हेंबरला अपघात झाला. यात गंभीर जखमी झाल्याने तातडीने नातेवाईकांनी उपचारासाठी ‘एम्स’मध्ये दाखल केले. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्या उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे डॉक्टरांच्या पथकाने मेंदूपेशी मृत पावत असल्याचे निदान केले. मेंदूपेशी मृत्यू होत असताना लीना यांच्या हृदयाला रक्तपुरवठा होत नसल्याने हृदयाची क्रिया बंद पडत असल्याचे डॉक्टरांना लक्षात आले.

डॉ. सुचेता मेश्राम यांनी वेळेचे गांभीर्य ओळखून तातडीने लीना यांच्या कुटुंबीयांचे अवयवदानासाठी समुपदेशन केले. अवयवदानाची लेखी परवानगी मिळताच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. लिना यांच्या अवयवदानामुळे उपलब्ध झालेल्या दोन्ही किडनीतून दोघांना जीवनदान मिळाले. एक किडनी २२ वर्षीय तरुणाला तर दुसरी किडनी ३३ वर्षीय रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित केली. त्यांचे हृदय आणि यकृताचे वैद्यकीय कारणास्तव प्रत्यारोपण होऊ शकले नाही.

‘एम्स’ ठरले देशातीलतिसरे केंद्र

हृदयक्रिया थांबलेल्या महिलेचे ‘ऑर्गन रिट्रायव्हल’ करणारे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) हे देशातील तिसरे केंद्र ठरले आहे. चंदिगड येथील पीजीआय आणि अहमदाबाद येथील आयकेडीआरसी या दोनच ठिकाणी अशा प्रक्रारचे ऑर्गन रिट्रायव्हल झाले आहे. मात्र रविवारी (ता.३) झालेल्या अनोख्या अवयवदानानंतर नागपुरातील एम्स या यादीत सामील झाले आहे. अमेरिका आणि युरोपातील स्पेन सारख्या प्रगत देशांमध्ये अशा प्रकारचे अवयवदान होते. नेफ्रोलॉजिस्ट डॉ. आनंद चेलापन, डॉ. अमोल भवने, किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, डॉ. चंद्रकांत मुंजेवार, डॉ. नीलेश नागदिवे, डॉ. मोहनसुंदरम, डॉ. मनप्रीत उप्पल, डॉ. कपिल, डॉ. भुवनेश्वरी बी., डॉ. बरखा, डॉ. रेवंत, डॉ. मोहन, डॉ. महक, डॉ. गायत्री यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली.

लीना काकडे यांची हृदयक्रिया बंद होण्याच्या मार्गावर होती. अशावेळी अवयव काढण्यासाठी वेळच नसतो. असे असताना अत्यंत कमी वेळात अवयव प्रत्यारोपणाचा निर्णय घेतल्यानंतर तत्काळ प्रत्यारोपण करण्यात एम्समधील डॉक्टरांना यश आले. अमेरिका, युरोपातसारख्या प्रगत देशांमध्ये असे अवयवदान केले जाते. मात्र एम्ससाठी ही घटना नवीन होती. एम्समधील डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारत हे अवयव प्रत्यारोपण यशस्वी केले. अशाप्रकारे ऑर्गन रिट्रायव्हल करणारे एम्स महाराष्ट्रातले पहिले आणि देशातले तिसरे रुग्णालय झाले आहे.

-डॉ. मनीष श्रीगिरीवार, वैद्यकीय अधीक्षक, एम्स, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com