esakal | दिलासादायक! ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपूरमार्गे रवाना; दोन दिवसात प्राणवायू घेऊन परतणार

बोलून बातमी शोधा

oxygen
दिलासादायक! ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपूरमार्गे रवाना; दोन दिवसात प्राणवायू घेऊन परतणार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उपलब्ध ऑक्सिजन अपुरे असल्याने विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन आणले जाणार आहे. त्यासाठी देशातील पहिली ऑक्सिजन ट्रेन पाठविण्यात आली आहे. ही ट्रेन मंगळवारी सायंकाळी नागपूरमार्गे रवाना झाली. ही ट्रेन पुढच्या दोन दिवसांमध्ये ऑक्सिजन घेऊन नागपूरमार्गेच परतेल.

हेही वाचा: ‘गेम’ होण्याच्या भीतीपोटी त्यानं केला पिंकीचा खून; हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक

कोरोना रुग्णावर उपचारासाठी परराज्यातून ऑक्सिजनची जुळवाजुळव करण्यात येत आहे. भारतीय रेल्वेच्या रो-रो सेवे अंतर्गत विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी रिक्त मालगाडी पाठविण्यात आली आहे. सोमवारी रात्री कळंबोली येथून १६ टन क्षमतेचे सात रिकामे टँकर घेऊन पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना झाली.

ही गाडी मंगळवारी बडनेरामार्गे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात दाखल झाली. त्यानंतर सायंकाळी नागपूरमार्गे पुढे रवाना झाली. नागपूर स्थानक ओलांडताच गाडी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कक्षेत दाखल झाली. वैजाग, जमशेदपूर, राउरकेला, बोकारो येथून ऑक्सिजन घेतले जाणार आहे. बुधवारी दुपारपर्यंत ही एक्स्प्रेस विशाखापट्टणमला पोहोचण्याची शक्यता आहे. ट्रँकर खाली उतरविणे व चढविण्यासाठी रॅम्प तयार करण्यात आला आहे. टँकर भरून घेतल्यानंतर ते पुन्हा त्याच मालगाडीनू महाराष्ट्राच्या दिशेने रवाना होईल. साधारणपणे गुरुवार किंवा शुक्रवारी ही एक्स्प्रेस नागपूरमार्गे महाराष्ट्रात दाखल होईल.

हेही वाचा: रेल्वे रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार; क्वॉरंटाइन कोचेसच्या वापरासंदर्भातही चर्चा सुरु

कोरोना रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल झपाट्याने खाली येत असल्याने उपचारासाठी प्राणवायू महत्त्वाचे आहे. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. ऑक्सिजनची पर्यायी जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. पण, त्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. अशावेळी रेल्वेने पोहोचणारा ऑक्सिजनचा साठा रुग्णावर उपचारासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. येवढेच नाही तर गरजेनुसार देशाच्या अन्य भागात ऑक्सिजन वाहून नेण्याच्या दृष्टीने हा पथदर्शी उपक्रम ठरणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ