नागपूर ः नागपुरात मागील दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर मृत्यूचा आकडा प्रचंड फुगला आहे. कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज वाढत आहेत. यामुळे मेडिकल प्रशासनाने येथील ऑक्सिजन प्लान्टची क्षमता नसताना साडेतीनशे पाॅइंट वाढवले. यामुळे मध्यरात्रीनंतर होणारा ऑक्सिजनचा पुरवठा संथ होतो. प्रसंगी व्हेंटिलेटवरील कोरोनाबाधितांच्या जीवावर बेतणारे प्रसंग घडत आहेत. विशेष असे की, ऑक्सिजन प्लान्टवर बर्फाचे आवरण तयार झाल्याची माहिती पुढे आली. नेमके याच काळात मेडिकलमध्ये वॉर्ड क्रमांक १३ मध्ये ७ तर वॉर्ड क्रमांक १२ मध्ये ३ जण दगावल्याची घटनेमुळे खळबळ उडाली.
कोरोनाचे संकट वाढणार आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ऑक्सिजन प्लान्टमध्ये क्षमतेनुसार ४५० पाॅइंट आहेत. मात्र, जुलै महिन्यांपासून मृत्यूसंख्येत भयावह स्थितीत वाढ झाली. ऑगस्टमध्ये ९०० पेक्षा अधिक मृत्यू नागपुरात झाले. सप्टेंबरच्या पाच दिवसात अडीचशेपेक्षा जास्त जण दगावले. दर दिवसाला व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
मात्र ऑक्सिजनचा मर्यादित पुरवठा असल्यामुळे मेडिकलमध्ये तुडवडा निर्माण झाला. यामुळे मेडिकल प्रशासनाने अचानक साडेतीनशे पॉईंट वाढवले. यामुळे मध्यरात्री रुग्णांना होत असलेला आॅक्सिजनचा पुरवठा संथगतीने होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सरासरी ३५ कोरोनाबाधितांचा मृत्यू नागपुरात दररोज होत आहे. यातील ६० टक्के मृत्यू मेडिकलमध्ये होत आहेत. मेडिकलमधील मृत्यूचा आकडा ६०० वर पोहचला. मृत्यूचा टक्का वाढल्यानंतरही मृत्यू वाढण्यामागची कारणमिमांसा मेडिकल प्रशासनाकडून होत नसल्याचे दिसून येत आहे.
ऑक्सिजनचा पुरवठा पाहिजे त्या गतीने होत नसल्यास लावण्यात आलेल्या यंत्रातून बिप वाजणे सुरू होते. याकडे मध्यरात्री कोणीही लक्ष देत नाही. एकदा ऑक्सिजनचा साठा भरल्यानंतर मर्यादित रुग्णांची संख्या असली की, रात्रभर पुरतो. परंतु ऑक्सिजन हवे असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर मात्र हा साठा किती वेळ पुरेल हे सांगणे कठीण आहे. रात्री अपरात्री ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यास तो पूर्ववत करण्याची जबाबरादी कोणाची? हा प्रश्न आहे.
जेसीबीने फुटली पाईपलाईन
ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याने जुने लिक्विड सिलिंडर लावण्याचा निर्णय मेडिकल प्रशासनाने घेतला. त्यानुसार कामाला सुरुवात झाली. मात्र, येथे पावसाचे पाणी साचले होते. यामुळे रस्ता तयार करण्यासाठी ‘जेसीबी’ लावण्यात आले. रस्ता तयार करताना जेसीबीद्वारे पाईपलाईन फुटली. यामुळे पुन्हा नवा पेच निर्माण झाला. दरम्यान मध्यरात्री व्हेंटिलेटवर असलेले रुग्ण ५०, ५१ आणि ५२ मध्ये हलवण्यात आले.
क्षमता वाढवण्यासाठी ॲक्शन प्लान
ऑक्सिजन प्लान्टचा घोळ झाल्याची घटना पुढे आली. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.६) जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी मेडिकलमध्ये भेट दिली. यावेळी व्हिएनआयटीमध्ये बायोमेडिकल तज्ज्ञांशी चर्चा झाली. या पथकाशी झालेल्या चर्चेतून ऑक्सिजन प्लान्ट सुरळित करण्यासंदर्भात ॲक्शन प्लान तयार करण्यात येत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी दिली.
प्लान्टची दुरुस्ती सुरू
मेडिकलच्या सेंट्रलाईज ऑक्सिजन प्लांटमध्ये तांत्रिक घोळ निर्माण झाला. ऑक्सिजन प्लान्टवर बर्फ साचला होता. बर्फ वितळवण्यात येत आहे. या प्लान्टची दुरुस्ती पुढील दोन ते तीन दिवस सुरू राहणार. सामान्य रुग्णांना २ ते ४ लिटर ऑक्सिजनची दररोज गरज असते. परंतु, कोरोनाच्या व्हेंटिलेटरवरील रुग्णाला सुमारे १५ ते ७० लिटरपर्यंत ऑक्सिजनची गरज पडते. त्यात रुग्णांची संख्या वाढली. यामुळे वापर वाढला. सुदैवाने हा प्रकार लवकरच लक्षात आला. युद्धपातळीवर तांत्रिक बिघाड दूर करून सेंट्रलाईज ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. ट्रॉमा केअर युनिटमध्ये लिक्विड प्लान्ट सुरू करण्यात येत आहे.
डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता मेडिकल, नागपूर.
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.