esakal | महापालिकेचे घोषित केलेले लसीकरण केंद्रच बंद, नागरिकांमध्ये संताप
sakal

बोलून बातमी शोधा

Corona vaccinations

महापालिकेचे घोषित केलेले लसीकरण केंद्रच बंद, नागरिकांमध्ये संताप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी रविवारी मनपाच्या दहा झोनमधील दहा केंद्रांवर व १८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह व इमामवाड्यातील आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये केंद्रांवर सुरू राहील, असे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, बहुतांश केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने नागरिकांची निराशा झाली.

हेही वाचा: सावधान! 'या' शहरात फक्त एक नव्हे तर ५ नवीन स्ट्रेन, लक्षणात बदल

राज्य सरकारने ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी मनपाला ११५० लस प्राप्त करून दिल्या होत्या. सोमलवाडा, केटीनगर, मानेवाडा, बाबूलखेडा, ताजबाग, हंसापुरी सतरंजीपुरा, पारडी, कपील नगर आणि झिंगाबाई टाकळी या १० केंद्रांवर लस उपलब्ध असेल, असे मनपाने काल जाहीर केले होते. रविवारी १८ वर्षांवरील अनेकजण गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह व इमामवाड्यातील आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये लसीकरणासाठी गेले. परंतु, लस उपलब्ध नसल्याचे कळले. एवढेच नव्हे या केंद्रांवरील अधिकाऱ्यांनाही लसीकरणाबाबत माहिती नसल्याचे पुढे आले. हीच बाब ४५ वर्षांवरील नागरिकांबाबतही घडली. विशेष म्हणजे डिंक दवाखान्याचे नाव नसताना डिंक दवाखान्यात लसीकरण सुरू होते. मनपाने शनिवारी रात्री लसीकरण दवाखान्याची नावे जाहीर करून चक्क धूळफेक केली. नागरिकांना एका केंद्रांवरून दुसऱ्या केंद्रावर फिरावे लागले. काही केंद्रावर लसीकरण सुरू होते. परंतु, गर्दीमुळे उन्हात ताटकळत बसण्याऐवजी नागरिकांनी घराची वाट धरली. अनेकजण दुसऱ्या डोससाठी आले मात्र त्यांचीही निराशा झाली.

हेही वाचा: 'नागरिकांनो! RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यास पाचव्या दिवशी करा HRCT'

एम्सला अवघ्या १५ लस -

लसपुरवठ्याची जबाबदारी केंद्र शासनाची आहे. मात्र, राज्याला त्या तुलनेत लस मिळत नाही. यामुळे लसीकरणादरम्यान मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. ४५ वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी महापालिकेला ११५० लस प्राप्त झालेल्या आहेत. यातील प्रत्येक केंद्राला १०० लस देण्यात आल्या. मात्र, मिहान परिसरातील एम्सला केवळ १५ लस (वायल) देण्यात आल्या असल्याची माहिती उघडकीस आली आहे. तर मेडिकलमध्ये कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देणे सुरू राहील. पहिला डोस घेणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे.

loading image