esakal | अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पेरणाऱ्यांच्याच नशिबी अंधार! कोरोनामुळे स्टेज लाइट व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

sad men

आजच्या घडीला विदर्भात प्रकाश व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या व्यवसायावर अनेक छोट्यामोठ्या कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.

अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पेरणाऱ्यांच्याच नशिबी अंधार! कोरोनामुळे स्टेज लाइट व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : कोरोनामुळे लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध इव्हेंट्स बंद आहेत. त्यामुळे यात सेवा प्रदान करणाऱ्या स्टेज लाइट व्यावसायिक व त्यांच्या परिवारासह कामगारांवरही आर्थिक संकट ओढवले आहे. वर्षभरापासून हा व्यवसाय ठप्प असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाने उपजीविकेचे साधनच हिरावून घेतल्याने त्यांचे एकूणच भविष्य अंधःकारमय झाले आहे.

आजच्या घडीला विदर्भात प्रकाश व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या व्यवसायावर अनेक छोट्यामोठ्या कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र कोरोना आल्यापासून त्यांच्या नशिबाचेच चक्र फिरले. मार्च २०२० मध्ये पहिल्यांदा लॉकडाउन लागल्यापासून सारेच बेरोजगार झाले आहेत. 

उपराजधानीत ‘लुटेरी दुल्हन’ पुन्हा सक्रिय; बलात्काराचा आरोपी भोळेच्या मदतीला धावली ‘प्रीती’

लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमांसह इतर इव्हेंट्स बंद असल्याने त्यांच्या हाताला कामे नाहीत. आपल्या व्यथा सांगताना विदर्भ लाइट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवशंकर माळोदे म्हणाले, मागील वर्ष आमच्यासाठी खूपच वाईट गेले. मधल्या काळात अनलॉक झाल्यानंतर काही दिवस डिस्टन्सिंगच्या अटींवर विवाह सोहळे झाले. मात्र आमची मुख्य कमाई असलेल्या रंगमंचांवरील कार्यक्रमांना शेवटपर्यंत परवानगी मिळाली नाही. 

वर्षभरापासून व्यवसाय बंद असल्यामुळे किराया, घरभाडे, इलेक्ट्रिक बिल, मासिक हप्ते, कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत व्यावसायिक आहेत. आमच्यावर अवलंबून असणाऱ्या गोरगरीब इलेक्ट्रिशियन्स व मजुरांची अवस्था सर्वात वाईट आहे. लॉकडाउनकाळात शेकडो मजूर, भिक्षेकरी व झोपडपट्टीवासींना मदत करण्यात आली. दुर्दैवाने प्रकाश व्यवसायातील एकाही गरजवंतांसाठी कुणीच पुढे आले नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

अनेक व्यावसायिक नैराश्यात

वर्षभरापासून धंदा बंदच आहे. कामे नसल्यामुळे अनेक व्यावसायिक, कामगार नैराश्यात जीवन जगत आहेत. आर्थिक अडचणीमुळे काहींनी आत्महत्या केल्या, तर काहींच्या तब्येती बिघडल्या. अनेकांनी वाट बदलून उदरनिर्वाहाचा नवा पर्याय शोधला आहे.

प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा

असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व आयुक्तांसह अनेकांना भेटून आपल्या समस्या मांडल्या. मोर्चादेखील नेला. परंतु आश्वासनाखेरीज त्यांना काहीही मिळाले नाही. प्रशासनाने केवळ आमच्या व्यवसायाला परवानगी द्यावी, एवढीच आमची इच्छा व मागणी असल्याचे माळोदे म्हणाले.

नागपुरात गुन्हा दाखल झाला अन् पोलिस निरीक्षकानं नाशकातून काढला पळ

कोरोना व लॉकडाउनमुळे आमचे आयुष्य अंधःकारमय झाले आहे. उपजीविकेचे साधन हिरावून गेल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा अडचणीच्या परिस्थितीत आम्हाला प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
-शिवशंकर माळोदे, 
अध्यक्ष, विदर्भ लाइट ओनर्स असोसिएशन

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top