Police Helpline : पोलिस मदत क्रमांक ११२ ‘लेट है क्या’? वेळेवर मिळेना मदत

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस विभागामार्फत ‘१००’ क्रमांक मदतीसाठी देण्यात आला होता.
112 police helpline
112 police helplinesakal
Summary

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस विभागामार्फत ‘१००’ क्रमांक मदतीसाठी देण्यात आला होता.

नागपूर - वाढत्या शहरीकरणात गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. त्यातून पोलिसांनी नागरिकांच्या सोयीसाठी कुठेही अपघात, चेन स्नॅचिंग वा इतर घटना घडल्यास तत्काळ मदत मिळावी यासाठी ‘११२’ हा हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. मात्र, हा क्रमांक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून त्यातून उशिरा प्रतिसाद मिळत असल्याने गुन्ह्यात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस विभागामार्फत ‘१००’ क्रमांक मदतीसाठी देण्यात आला होता. तो डायल करताच थेट पोलिस कंट्रोल रुममध्ये महिती जाताच ती संबंधित पोलिस ठाण्यातील बिट मार्शल किंवा पेट्रोलिंग मोबाईल व्हॅनकडे जात होती. त्यामुळे पीडित वा गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी ती माहिती अतिशय महत्त्वपूर्ण ठरत होती. मात्र, दीड वर्षांपूर्वी राज्यासह देशात ‘डायल ११२’ हा नवा क्रमांक देण्यात आला. त्यामुळे १०० ऐवजी ११२ क्रमांकावर कॉल करून नागरिकांना संबंधित तक्रारी आणि घटनांची माहिती देणे शक्य झाले. मात्र, या सुविधेतून नागरिकांचे प्रश्‍न सुटण्याऐवजी त्यात वाढ होताना दिसत आहेत.

एखाद्या नागरिकाने कॉल लावल्यावर त्याला ५ ते १० मिनिटात मदत मिळणे अपेक्षित असताना, ती अर्धा तास उलटून गेला तरी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर अकुंश लावण्यात पोलिसांना अडचण होत आहे. दरम्यान याबाबत पोलिसांना विचारणा केली असता, त्यांनीही ही अडचण असल्याचे मान्य केले.

अशी आहे अडचण

स्मार्ट कंट्रोल रुम डायल ११२ तयार केल्याने गरजूंना वेळेवर पोलिस मदत न मिळण्याची कारण की, ११२ डायल केले असता, आधी भाषेसाठी १,२, ३ क्रमांक दाबा असा आवाज येतो. त्यानंतर हा कॉल मुंबई येथील कॉल सेंटरवर जातो. तो त्याबाबत अधिक माहिती विचारत असल्याने त्यात वेळ जातो. त्यानंतर तो नागपूर लकडगंज पोलिस सेंटरवर फॉरवर्ड करतो. तिथून पोलिस कंट्रोल रुमला फॉरवर्ड होतो. तिथे असलेले कार्यरत कर्मचारी हे स्क्रीनवरची कॉलची माहिती चेक करतात, तिथून संबंधित पोलिस ठाण्यांतर्गत कार्यरत मोबाईल व्हॅन किंवा बिट मार्शलच्या स्मार्टफोनवर फॉरवर्ड करतात. त्यामुळे या प्रक्रियेत १५ ते २० वीस मिनिटे निघून जातात. त्यानंतरही बरेचदा ही माहिती मोबाईल व्हॅन किंवा बीट मार्शलला माहिती मिळत नाही.

सातत्याने संदेश कसा बघायचा

डायल ११२ वरून आलेला संदेश अनेकदा बिट मार्शल मिळत नसल्याचे दिसते. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी घटनेचा संदेश हे त्यांच्या ‘एमडीटी’ टॅबवर दिला जाते. मात्र, गाडी चालविताना वा इतर कामात तो सातत्याने तपासणे शक्य होत नाही. त्यातून माहिती मिळत नसल्याने घटनांवर तत्काळ नियंत्रण मिळविता येत नाही.

११२ या क्रमांकावर डायल केल्यावर माहिती मिळण्यास उशिर होतो ही बाब खरी आहे. तो टायमिंग कमी करण्यासाठी प्रशासन काम करीत आहे. मात्र, यापूर्वी कंट्रोल रुमला केवळ स्थानिक पातळीवर काम होत होते. आता राज्यभरात ११२ च्या माध्यमातून कॉल होतात. त्यासाठी मोठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यातून अनेकांना तत्काळ मदतही होते.

- विलास सोनवणे, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस नियंत्रण कक्ष

अप्रशिक्षित कर्मचारी

स्मार्ट कंट्रोल रूममध्ये प्रत्येकाच्या स्क्रिनवर माहिती आल्यावर ती माहिती त्या परिसरात असलेल्या मोबाईल व्हॅनला देण्यात येते. मात्र, माहिती मिळण्यास वेळ लागत असल्याने त्यावेळी त्या ठिकाणी असलेले बीट मार्शल वा मोबाईल व्हॅन लगेच दुसऱ्या कॉलवर जातात. त्यामुळे नागरिकांना मदत मिळत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com