पोल्ट्री उद्योगाला महागाईचा चटका; खाद्य महागले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Poultry farm

पोल्ट्री उद्योगाला महागाईचा चटका; खाद्य महागले

नागपूर : शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसापासून कोंबड्यांच्या खाद्यात सतत वाढ होत असल्याने या व्यवसायावर संक्रांत आली आहे. पूर्वी एका कोंबडीच्या पालनासाठी ७० रुपये खर्च येत होता आता तो शंभर रुपयावर गेल्याने कुक्कुटपालन आता फायद्याचा नव्हे तर तोट्याचा व्यवसाय झाला आहे. परिणामी, कुक्कुटपालक अडचणीत सापडले आहेत.

कोंबड्यांच्या खाद्यात मुख्यतः कनकी, मका, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरीचा समावेश होतो. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या खाद्याच्या दरात ३० ते ३५ टक्के वाढ झालेली आहे. वाढत्या महागाईमुळे कुक्कुटपालन करणारे शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. उन्हाळ्यात पाण्याची मोठी समस्या असते, त्यामुळे कोंबड्यांना वाचवणे अधिकच जिकरीचे झालेले आहे.

यंदा उत्पादन अधिक असल्याने अंड्यांचे भाव घसरले आहेत. त्याचवेळी, कोंबड्यांचे खाद्यदर वाढत आहे. अशा स्थितीत अंड्यांचा व्यापार हा पोल्ट्री उत्पादकांसाठी तोट्याचा सौदा ठरत आहे. गतवर्षीच्या तुलनेत कोंबडीच्या खाद्याचे दर वाढले आहेत, जे मागील वर्षी १२ ते १३ रुपये किलो होते, ते आता २१ ते २२ रुपये किलोवर पोहोचले आहे.

तसेच सोयाबीनचे दाणे ६२ रुपये किलो झालेले आहे. १२ रुपये किलो असलेली कनकी १५ रुपयांवर पोहोचली. पशुखाद्याप्रमाणेच कोंबड्यांचे खाद्यही महागल्याने व्यवसाय करताना अडचणी येत आहेत.

कच्च्या मालाच्या किमतीमुळे धान्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायाची अवस्था दयनीय झाली आहे. तसे पाहिल्यास, एक कोंबडी दररोज सुमारे ११० ग्रॅम धान्य खाते आणि १२० ते १५० दिवसांनी अंडी घालू लागते.

अशाप्रकारे आहेत भाव (रु.प्र. किलोत)

  • खाद्य - मागील दर - आताचे दर

    • सोयाबीन - ४० - ६५

    • मक्का - १६ - २१

    • कनकी - १२ - १५

    • शेंगदाणा ढेप - १२ - १६

''कोंबड्यांच्या खाद्यात विक्रमी भाववाढ झाल्याने कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांसाठी आता जोडधंदा राहिलेला नाही. कुक्कुटपालन करण्यासाठी लागणारे खेळते भांडवल वाढले असून नफा कमी झालेला आहे. तसेच व्यापाऱ्यांनी उधारीत खाद्य देणे बंद केलेले आहे. या सर्व अडचणीत सर्वसामान्य शेतकरी सापडल्याने हा व्यवसाय त्यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे.''

- सुधीर दुद्दलवार, पोल्ट्री व्यावसायिक

Web Title: Poultry Industry Inflationary Pressures Food Is Expensive

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..