esakal | ऑक्सिजन सिलिंडर आणा, नाहीतर रुग्ण दुसरीकडे हलवा; लाखो रुपये देऊनही रुग्णांचे हाल

बोलून बातमी शोधा

oxygen
ऑक्सिजन सिलिंडर आणा, नाहीतर रुग्ण दुसरीकडे हलवा; लाखो रुपये देऊनही रुग्णांचे हाल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाबाधितांच्या उपचारात सरकारी रुग्णालयात हयगय होत असली तरी, ते सेवाभावी वृत्तीतून काम करीत आहेत. मात्र, खासगी रूग्णालये व्यावसायिक बनली आहेत. अलीकडे धंतोली येथील एका रुग्णालयात दहा दिवसांपासून उपचार घेत असलेल्या महिला रुग्णाच्या नातेवाइकांना ऑक्सिजनची सोय करण्यास बाध्य करण्यात येत आहे. 'तुम्हीच सिलिंडर आणा, नाहीतर इतर रुग्णालयात हलवा' अशी सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे. खासगी रुग्णालयाच्या अशा धोरणामुळे नातेवाइकांसमोर ऑक्सिजन जमविण्याचा नवा पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा: व्हीआयपींच्या एका फोनवर मिळतो लसीचा डोस; सामान्यांना मात्र बाहेरचा रस्ता; नागपुरातील वास्तव

खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर काय उपचार सुरू आहेत, याची कोणालाही माहिती मिळत नाही. तर दर दिवसाला पैसे भरा असे सांगण्यात येते. आतापर्यंत या रुग्णालयात सुमारे साडेतीन लाखांवर खर्च झाला असल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाइकानी दिली. आतापर्यंत उपचार सुरू होते. मात्र, आता अचानक माणुसकीही हरवल्यासारखे येथील डॉक्टरांनी यापुढे आम्ही ऑक्सिजन पुरवू शकत नाही. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करा अन्यथा रुग्णास दुसरीकडे हलवा, असे नातेवाइकांना सांगण्यात आले. खुद्द नातेवाइकाने हा प्रकार सांगितला असून या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. रुग्णाच्या उपचाराची माहिती व प्रकृती कशी आहे, याबद्दलही कुठलीच माहिती दिली जात नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या आत रूग्ण कसा आहे, याबद्दल नातेवाइकांच्या मनातही शंका असते. रुग्णाची प्रकृती बरी असल्यास किमान मोबाईलवरून नातेवाइकांच्या संपर्कात असतो. अनेक रुग्णांना मोबाईल हाताळण्यास रुग्णालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. धंतोलीतील या खासगी रुग्णालयात नातेवाइकांना मोबाईल करून रुग्णासाठी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करा, असा संदेश दिला. अन्यथा, घरी वा इतर दुसऱ्या ठिकाणी हलवा असे स्पष्ट केले. नातेवाइकांनी हतबलता व्यक्त केली. त्यामुळे खासगी रुग्णालये महापालिकेने ताब्यात घ्यावे, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.

हेही वाचा: आज नभांगणात दिसणार 'सूपर पिंक मून', दुर्बिणीशिवायही पाहता येणार

गाऱ्हाणे मांडायचे कुठे? -

सिलिंडरची व्यवस्था न झाल्यास रुग्णास दुसऱ्या रुग्णालयात हलवा, असेही रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले. रूग्ण गंभीर अवस्थेत असताना आता हलविणार कुठे? कोणत्या रुग्णालयात रिकामी खाट मिळेल हे व इतरही प्रश्न नातेइवाइकांना सतावत आहेत, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली, मात्र, दखल घेतली नाही, अशावेळी रुग्णांनी कोणाकडे गाऱ्हाणे मांडायचे असाही सवाल नातेवाइकांनी केला.