esakal | साडेचार लाख रक्कम घेऊनही पावती देण्यास नकार, खासगी रुग्णालयाचा प्रताप

बोलून बातमी शोधा

file photo
साडेचार लाख रक्कम घेऊनही पावती देण्यास नकार, खासगी रुग्णालयाचा प्रताप
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना (coronavirus) रुग्णावर उपचार करताना साडेचार लाख रुपये रोख रक्कम रुग्णालयाला अदा केली. मात्र, येथील रुग्णालय प्रशासनाने अर्थात रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर यांनी साडेचार लाख रुपयांचे बिल देण्यास नकार दिला. एवढ्या मोठ्या रकमेचे बिल देता येणार नाही, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकाने महापालिकेचे उपायुक्त (deputy commissioner of nagpur municipal corporation) यांच्याकडे तक्रार केली आहे. अशाप्रकारे खासगी रुग्णालयांकडून लुट होत असून हा सारा प्रकार प्रशासन उघड्या डोळ्यांनी बघत असल्याची टीका नातेवाइकांनी केली. (private hospitals not gave receipt after taking more charges in nagpur)

हेही वाचा: सायबर गुन्हेगाराच्या घशातून पैसे आणले परत; नागपूर सायबर पोलिसांची कामगिरी

जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालये नियम धाब्यावर बसवून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना लाखो रुपये अ‌ॅडव्हान्स म्हणून घेत आहेत. दीड ते पाच लाख रुपयांपर्यंत अग्रीम राशी घेत असून त्याची ना पावती ना, देयक देण्यात येत. मंगळवारी एका रुग्णाच्या मुलाचे कामठी रोडवरील मोहननगरच्या एका रुग्णालयातील डॉक्टरसोबत झालेले संभाषण समाजमाध्यमांवर प्रसारित झाले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्याची तक्रारही महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे करण्यात आली आहे. महापालिकेने संबंधित रुग्णालयाला तातडीने या प्रकरणाचे उत्तर मागितले असून या रुग्णालयावर कारवाई होणार काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

वडिलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्याने या खासगी रुग्णालयाशी संपर्क केला. त्याला पाच लाख रुपये जमा करण्यास सांगितले. मुलाने साडेचार लाखांची जुळवाजुळव केली. रुग्णालय प्रशासनाकडे भरले. रकमेची पावती दिली नाही. उपचारादरम्यान औषधांसह इतर तपासणीचे सुमारे १ लाख २० हजारांचे शुल्कही वेगळे भरले. दहा दिवसांनी रुग्ण बरा झाल्यानंतर मुलाने देयक व पावती मागितली. परंतु, रुग्णालयाने सपशेल नकार दिला. उलट तुम्हाला एवढ्या रकमेचे देयक देणार नसून सीजीएचएसच्या नियमानुसार तुम्हाला भरपाई मिळेल तेवढेच देयक देण्याचे मान्य केले. जर मी रक्कम घेतल्याचे कबूल न केल्यास उलट तुम्हाला आताचे देयक भरणे बंधनकारक असल्याचा दम भरला.

हेही वाचा: वारली चित्रकलेतून साकारले भिंतींवर रामायण; अमरावतीच्या तरुणीचा अनोखा उपक्रम

नातेवाईकांकडून घेतले उधार

मुलाने वडिलांवर उपचारासाठी नातेवाइकांकडून उसने पैसे आणले होते. त्यामुळे देयक जितक्याचे असेल, तेवढी रक्कम घेऊन इतर रक्कम परत मागितले असता रुग्णालयाकडून सपशेल नकार देत आम्हाला सरकारने २० टक्के खाटांवर मनात येईल तेवढे शुल्क घेण्याची मुभा दिल्याचा धक्कादायक तर्क दिला. डॉक्टर देयक व पावतीसह अग्रीममधील शिल्लक राशी परत देत नसल्याचे बघत शेवटी रुग्णाच्या मुलाने हे डॉक्टरांसोबत भ्रमनध्वनीवर झालेल्या संभाषणाची ध्वनिफीत समाजमाध्यमावर प्रसारित केली. सर्वसामान्य नागरिकांमध्ये रुग्णालयाच्या विरोधात रोष वाढत आहे. तर मुलाकडून या विषयाची तक्रार नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलद शर्मा यांना करण्यात आली. महापालिकेने तातडीने डॉक्टरांना नोटीस देत या विषयावर उत्तर मागितले आहे. विम्स रुग्णालयाचे डॉ. राजेश सिंघानिया यांच्याशी संपर्क साधला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. डॉक्टर शल्यक्रियेत व्यस्त असल्याचे सांगत बोलण्यास टाळले.

रुग्णाच्या मुलाने दुपारी माझी भेट घेऊन संबंधित रुग्णालयाने माझ्याकडून साडेचार लाख रुपये अग्रिम घेऊनही देयक व पावती दिली नसल्याची तक्रार दिली. त्यावर महापालिकेने तातडीने रुग्णालयाला या प्रकरणाचे उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. त्यात रुग्णालयाचा दोष असल्यास निश्चित त्यांच्यावर कारवाई करून रुग्णाचे पैसे परत मिळवून देण्यासाठी नियमानुसार मदत केली जाईल.
- जलद शर्मा, अतिरिक्त आयुक्त, नागपूर महापालिका.