बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे कारकिर्द प्रगती योजनेचा लाभ; डेअरी सायन्सच्या तीन प्राध्यापकांचा समावेश

Professors of Dairy science submitted fraud certificates for scheme in Nagpur
Professors of Dairy science submitted fraud certificates for scheme in Nagpur

नागपूर : कारकिर्द प्रगती योजनेचा लाभ पदरात काढून घेण्यासाठी नागपूरच्या महाराष्ट्र पशुमत्स्य विज्ञान विद्यापीठातील डेअरी सायन्सच्या तीन प्राध्यापकांनी बनावट प्रमाणपत्रे सादर करून वरिष्ठ श्रेणी आणि प्राध्यापकांची पदे हस्तगत केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे सेवाजेष्ठता डावलून मर्जीतील अधिकाऱ्यांना पद बहाल केल्याने विद्यापीठात कमालीची अस्वस्थता असल्याचे समजते. 

अकोला कृषी विद्यापीठातील बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे उच्चपदांवर वर्णी लावण्याचे प्रकरण ताजे असतानाच ‘माफसू’ तील या नव्या प्रकरणामुळे विद्यापीठाचे नाव बदनाम होत आहे. शिक्षण,संशोधन आणि विस्तारात्मक आदी बाबीमंध्ये पिछाडी असताना मर्जीतील अधिकाऱ्यांना वरिष्ठ पदे बहाल करण्याचे प्रकार समोर येत असल्याने प्रशासकीय व्यवस्थेची कमकूवत बाजू समोर आली आहे. 

पशु विज्ञान विद्यापीठातील डेअरी सायन्सच्या तीन प्राध्यापकांकडून कारकीर्द प्रगती योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क संगणकावर प्रमाणपत्रे छापून त्यावर सेवानिवृत्त झालेल्या सहयोगी प्राध्यापकाच्या(प्रभारी प्राचार्याच्या) स्वाक्षऱ्या घेऊन २५ ते ३०  प्रमाणपत्रे कारकीर्द प्रगती योजनेच्या प्रस्तावासोबत सादर केली. विशेष म्हणजे या प्रमाणपत्रांवर कुठेही दिनांक किंवा जावक क्रमांक तसेच विद्यापीठाचा किंवा महाविद्यालयाचा ठसासुद्धा नाही.

अशा प्रकारच्या अनुभव, अनुकरणीय कार्ये, कौतुकास्पद उपक्रम राबविल्याची बोगस प्रमाणपत्रांचा आधार घेत  गुणांकन वाढून घेऊन वरिष्ठ श्रेण्या तसेच प्राध्यापकांची पदे हस्तगत करून २००८-०९ पासून ते आजतागायत लाखो रुपयांची वेतनवृद्धी पदरात पाडून अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता व विभाग प्रमुख या सारख्या निर्णय प्रक्रियेतील कार्यकारी पदांवर स्थानापन्न झाले. एवढ्यावरच ते थांबले नाही तर विद्यापीठाच्या अधिष्ठाता, संचालक वगैरे पदांकरिताच्या जाहिरातीच्या अनुषंगाने आवेदन पत्रेसुद्धा दाखल केली असल्याचे आणि त्यातसुद्धा बोगस प्रमाणपत्रे जोडल्याचे समजते. शिक्षकपेशाला काळीमा फासणाऱ्या या शिक्षकांचे बिंग याच विद्यापीठातील एका  सेवानिवृत्त अधिकाऱ्याने फोडले आहे. 

राज्यपालांकडे तक्रार

सेवानिवत्त अधिकाऱ्याने तक्रार करीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे जवळपास ५० बोगस प्रमाणपत्रे सूपूर्द  केली. राज्यपालांनी याची दखल घेत त्यांनी याप्रकरणी ताबडतोब कारवाई करण्यास कुलगुरूंना सांगितले. मात्र, चार-पाच महिने कोणतीही कारवाई न  झाल्याने कुलपतीच्या कार्यालयातून पुन्हा विचारणा झाली. यानंतर एक चौकशी नेमण्यात आली आहे. या चौकशी समितीमधील अधिकारीही मर्जीतीलच असल्याचे बोलले जाते. ही समिती काय कारवाई करते याकडे आता लक्ष लागून आहे. 

त्यांचीही वेतनवाढ रोखा

एका प्राध्यापकाची वेतनवाढ नुकतीच रोखण्यात आल्याची चर्चा आहे. ‘माझीच वेतनवाढ का थांबविण्यात आली. त्या दोघांचीही थांबवा’, असे हे प्राध्यापक बोलत असल्याचे समजते. 

विद्यापीठातील या प्रकणाच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली आहे. प्रमाणपत्रे वोगस असल्यास त्यांची शहानिशा करण्यात येईल. समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येईल.
डी.बी. राऊत,
रजिस्टार, माफसू

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com