esakal | खोचला पदर आणि हाती घेतली शेतीची कमान! पुरस्कारप्राप्त विदर्भातील पहिल्या महिलेचा मान
sakal

बोलून बातमी शोधा

Success Story : खोचला पदर आणि हाती घेतली शेतीची कमान!

Success Story : खोचला पदर आणि हाती घेतली शेतीची कमान!

sakal_logo
By
सुधीर बुटे

काटोल (जि. नागपूर) : जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने एखाद्या क्षेत्रात स्वतःला झोकून दिले की यश हमखास मिळते. मग ती व्यक्ती पुरुष असो की स्त्री याने काहीच फरक पडत नाही. हीच बाब काटोल तालुक्यातील लाडगाव येथील कृषिनिष्ठ शेतकरी पुष्पा अशोकराव रिधोरकर यांनी सिद्ध केली. मनाशी निश्चय केला तर अतिशय कष्टप्रद आणि निसर्गावर अवलंबून असणाऱ्या कृषीक्षेत्रात देखील यश संपादन करता येते हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘जिजामाता कृषिभूषण’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळविणाऱ्या विदर्भातील पहिला महिला म्हणून त्यांच्या नावाची नोंद आहे. याशिवाय कृषी विभाग, सामाजिक संस्था आदींनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

काटोलपासून पाच किलोमीटर अंतरावरील लाडगावात त्यांची शेती आहे. माहेरी शेती असल्याने त्यांना बालपणापासून शेतीची आवड होती. बालपणातच त्यांना कृषीविषयक धडेही मिळाले. कालांतराने त्यांचे लग्नसुद्धा कृषीसंपन्न कुटुंबात झाले. त्यांचे पती स्व. अशोकराव रिधोरकर विपणन महासंघात नोकरीला होते. शेतात जाण्याची गरज नसताना केवळ आवड म्हणून त्यांनी वयाच्या तिशीपासून शेतीवर लक्ष केंद्रित केले.

हेही वाचा: काँग्रेस-भाजप नगरसेवकांत सामना रंगण्याची शक्यता; उद्या सभा

मुले शाळेत जाऊ लागल्यापासून वेळेचा सदुपयोग करण्यासाठी त्या शेतीकडे वळल्या. शेतीत कोणती पिके घ्यायची, फळबागांचे नियोजन अशोकराव यांच्या मार्गदर्शनात व्हायचे. शेती करताना निराशा, आळस बाजूला सारून परिस्थितीवर कशी मात करता येईल, असे मार्ग त्यांनी निवडले. यासाठी त्यांना कुटुंबीयांची साथ लाभली. हळूहळू त्यांनी एक हजार संत्रा झाडांची बाग फुलवली.

याशिवाय जोड उत्पादन अर्धा एकर जागेत संत्रा कलमांची नर्सरी ज्यात ३५ ते ४० हजार कलमा तयार केल्या जात आहेत. या कलमांना परतवाडा, मोर्शी, बुलढाणा, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातही मोठी मागणी आहे. याशिवाय अहिल्याबाई होळकर भाजीपाला नर्सरी योजनेअंतर्गत नेट शेडमध्ये विविध भाजीपाल्याची रोपे तयार करण्याचे नावीन्यपूर्ण काम त्यांच्या शेतात केवळ पाव एकर (दहा गुंठे) जागेत केले जाते. या कार्यात त्यांच्या सोबत मोठा मुलगा नीलेश आणि लहान मुलगा सुशील मदतीला असतो. शेतात संत्राबाग, नर्सरी यासोबतच कापूस, सोयाबीन, तूर, गहू, हरबरा आदी पिके घेतली जातात.

कार्याची शासनाकडून दखल

१३ डिसेंबर १९९७ रोजी तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर, मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते मुंबईत विदर्भातील पहिली महिला शेतकरी म्हणून पुष्पा रिधोरकर यांना शासनाच्या प्रतिष्ठेच्या ‘जिजामाता कृषिभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी ३० वर्षांपूर्वी संत्रा बाग व नर्सरीकरिता गांढूळ खत, ठिंबक सिंचन व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला. या कामाची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले. महाराष्ट्राच्या सुवर्ण जयंतीनिमित्त (५० वर्षे) पुणे येथे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषिमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कोकण विद्यापीठ, एनआरसीसी नागपूर, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, आरसीएफ, रायसोनी इंजिनिअरिंग महाविद्यालयासह अनेक पुरस्कार त्यांना मिळालेत.

हेही वाचा: नागपुरात ऊन-पावसाचा लपंडाव; सकाळी जलधारा, दुपारी लख्ख ऊन

किडीवर नियंत्रणासाठी जैविक तंत्रज्ञान

उत्पन्न वाढविण्यास पिकांवर कीड नियंत्रणाकरिता जैविक तंत्रज्ञान सोलर ट्रॅप लाईटचा वापर, जीवामृत, दशपर्णी अर्क, शेणखत, गांढूळ खत, डी-कम्पोजर यामुळे मित्र कीड व सूक्ष्म जिवाणू वाढून पिकांना फायदेशीर ठरत असल्याचे नीलेश रिधोरकर यांनी सांगितले.

कोणत्याही क्षेत्रात जिद्दीने काम केले की यश हमखास मिळते. यशापाठोपाठ सन्मान आपोआप येतो. कुणावर जास्त विसंबून न राहता वेळप्रसंगी स्वतः जबाबदारीने कामातील उणीव भरून काढल्यास समस्या कमी होतात. याकरिता इच्छाशक्तीची गरज आहे. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अशक्य नाही. मग ती महिला आहे की पुरुष, ही बाब महत्त्वाची ठरत नाही.
- श्रीमती पुष्पा अशोकराव रिधोरकर, शासकीय पुरस्कारप्राप्त प्रगतिशील शेतकरी, लाडगाव
loading image
go to top