esakal | नागपुरात ऊन-पावसाचा लपंडाव; सकाळी जलधारा, दुपारी लख्ख ऊन
sakal

बोलून बातमी शोधा

rain

नागपुरात ऊन-पावसाचा लपंडाव; सकाळी जलधारा, दुपारी लख्ख ऊन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सकाळी पावसाने केलेली जोरदार बॅटिंग व काळ्या ढगांनी दाटलेल्या आकाशामुळे मंगळवारी दिवसभर पाऊस पडतो की काय, असे वाटत असतानाच दुपारी लख्ख ऊन पडले. परंतु, सकाळी कोसळलेल्या जलधारांनी निर्माण केलेल्या गारव्यामुळे दुपारी घामाच्या धारांनी उसंत घेतली. सायंकाळी काही भागात सरी कोसळल्या. एकूणच शहरवासींनी आजही ऊन पावसाचा लपंडाव अनुभवला.

पोळ्याच्या पाडव्याची सकाळ जोरदार पावसाने सुरू झाली. शहरात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे मारबत, बडग्याची मिरवणूकही विलंबानेच निघाली. मेघगर्जनेसह पावसामुळे अनेकांनी ‘मॉर्निंग वॉक’लाही दडी मारली. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते, चौक जलमय दिसून आले. सकाळी आठ वाजपासून सुरू झालेल्या पावसाने दोन तास शहर चिंब केले. त्यामुळे पोळ्यानिमित्त दारावर ठेवलेले मेढे जाळण्याचीही अनेकांची पंचाईत झाली.

हेही वाचा: पावसाचा कहर! विदर्भातील चार युवक गेले वाहून

पोळ्याचा पाडवा त्यात पावसामुळे अनेकांनी ऐनवेळेवर कार्यालयात जाण्याचा बेत रद्द केला. शहरातील मेडिकल चौक, मानेवाडा रोड, पडोळ हॉस्पिटल परिसरातील रस्ता, अशोक चौक, आशीर्वाद टॉकिज चौकासह अनेक रस्त्यांवर पाणी साचले. त्यामुळे कार्यालयात जाणाऱ्यांना पावसाच्या पाण्यातून मार्ग काढावा लागला.

सकाळी ढगांमुळे काळे कुट्ट झालेले आकाश दुपारपर्यंत स्वच्छ झाले अन् लख्ख ऊन पडले. परंतु, सकाळी पावसामुळे वातावरण थंड झाल्याने दररोजच्या तुलनेत उन्हाचे चटक्याची तीव्रता कमी होती. सकाळी शहरातील तुडुंब भरलेले नाले, दुपारपर्यंत नेहमीच्या संथगतीने वाहताना दिसून आले. सायंकाळी शहराच्या काही भागात सरी कोसळल्या. एकूणच दिवसभर ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ नागपूरकरांनी अनुभवला.

हेही वाचा: गोंदिया : मारबत विसर्जनासाठी गेले अन् चार युवक वाहून गेले

तान्हा पोळ्याची वेळ बदलली

कोरोनामुळे तान्हा पोळ्यावर निर्बंध असले तरी अनेक भागात सकाळी चिमुकल्यांना बोलावण्यात आले होते. परंतु, पावसामुळे आयोजकांना तान्हा पोळ्याची वेळ बदलावी लागली. दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने अनेक भागातील चिमुकल्यांनी तान्हा पोळा उत्साहात साजरा केला.

loading image
go to top