esakal | धक्कादायक! मृत व्यक्तीच्या नावाने धान्याची उचल? रास्त धान्य दुकानदाराचा काळाबाजार

बोलून बातमी शोधा

null

धक्कादायक! मृत व्यक्तीच्या नावाने धान्याची उचल? रास्त धान्य दुकानदाराचा काळाबाजार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोदामेंढी (जि. नागपूर) : राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत विविध योजनेखाली शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. अन्नधान्याचा वाटप करताना राज्यात तीन गटात वर्गवारी करण्यात आली आहे. धान्य वाटप करताना पारदर्शकता असावी, याकरिता अन्न व नागरी पुरवठा विभागाने पॉश मशीन व आधार लिंक कार्यान्वित केली. मात्र त्यातही शक्कल लढवीत चक्क मृत व्यक्तीच्या नावाने धान्याची उचल करीत रास्त धान्य दुकानदाराने डल्ला मारला. मृत व्यक्तीचे धान्य कुटुंबप्रमुखाला मिळाले नसून ते धान्य नेमके कुठे गेले असावे, असा सवाल पुढे आला आहे.

हेही वाचा: वीज ग्राहकांनो, आता SMS द्वारे महावितरणला पाठवा तुमचं मीटर रिडींग; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मौदा तालुक्यातील मुरमाडी येथील रास्त धान्य दुकानदार आठ ते दहा वर्षांपासून मृत व्यक्तीच्या नावाने धान्य उचल करीत आहेत. मृत व्यक्तीचे धान्य पुरवठा विभागामार्फत दुकानदाराला पुरवठा देखील करण्यात येतो. मात्र ते धान्य कुटुंबप्रमुखाला न देता धान्याचा काळाबाजार दुकानदार करीत आहे. शिधापत्रिकेवर प्रति व्यक्ती दर महिन्याला पाच किलो गहू आणि तांदूळ मिळतो.

त्याचबरोबर वर्गवारीनुसार अंत्योदय आणि दारिद्रयरेषेखालील कुटुंबियांना ३५ किलो धान्य व साखर वगैरे मिळत असते. मुरमाडी येथील रास्त दुकानदार मागील आठ ते दहा वर्षांपासून गावातील जवळपास बत्तीस मृत व्यक्तीचे धान्य घशात घालीत आहे. या मृत व्यक्तीचे धान्य पुरवठा विभागामार्फत पुरवठा देखील सुरळीत सुरु असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. संजय गवळी या व्यक्तीने याबाबतची तक्रार तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा: खारपाणपट्ट्यात केली कलिंगडाची लागवड; तोंगलाबादच्या काका-पुतण्याचा यशस्वी प्रयोग

दुकानदार पॉश मशीनद्वारे कुटुंबप्रमुखाचा ‘थम्ब’ लावून धान्य वितरण करीत असतो. मात्र कुटुंबातील मृत व्यक्तीचे धान्य पुरवठा बंद झाल्याचे सांगून ते धान्य घशात घालून त्याचा काळाबाजार करतो. दुकानदाराने आजपावेतो जवळपास दोन हजार क्विंटलपेक्षा अधिक धान्यावर डल्ला मारला आहे. खुल्या बाजारात त्याची विक्री करून लाखो रुपये कमविले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात पुरवठा विभागाचे देखील काही कर्मचारी सहभागी असल्याची शंका बळावली आहे. याप्रकारचा गोरखधंदा इतरही गावातील रेशन दुकानात होत असावा. याकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे.

संपादन - अथर्व महांकाळ