esakal | गव्हाच्या भावात होणार वाढ? अवकाळी पावसामुळे उत्पादन घटण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

rate of wheat may increases due to rain in nagpur

मागील वर्षी देशात धान्याचे २,९७५ लाख टन विक्रमी उत्पादन झाले होते. केंद्र सरकारच्या आकडेवारीप्रमाणे, देशात धानाचे १,२०३ लाख टन विक्रमी उत्पादन झाले होते. त्यापूर्वी म्हणजे २०१८-१९ मध्ये हे उत्पादन ११८८ लाख टन होते.

गव्हाच्या भावात होणार वाढ? अवकाळी पावसामुळे उत्पादन घटण्याची शक्यता

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उभ्या गव्हाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अद्याप किती नुकसान झाले हे पुढे आले नसले तरी एप्रिल महिन्यानंतर ही आकडेवारी पुढे येणार आहे. गेल्या आठवड्यात लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असताना गव्हाचे भाव प्रति क्विंटल १०० रुपयांनी वाढले. गव्हाच्या नुकसानीचा आकडा पुढे आल्यानंतर पुन्हा भाव वाढतील असे बोलले जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहर आणि विदर्भातील बाजारपेठा बंद असल्याने उलाढाल ठप्प झाली होती. उद्या सोमवारपासून पुन्हा बाजारपेठा दुपारी चार वाजेपर्यंत उघडणार असल्याने बाजारातील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - अख्खं गाव हळहळलं! पती-पत्नी पाठोपाठ मुलीचाही मृत्यू, एकाचवेळी निघाली तिघांची अंत्ययात्रा

यंदाच्या हंगामात ४२७.३६३ लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन ९.५६ टक्के जास्त आहे. मागील वर्षी गव्हाचे ३८९.९३ लाख टन उत्पादन झाले होते. पंजाबमध्ये १३० लाख टन, मध्यप्रदेशात १३५ लाख टन, हरियाणात ८० लाख टन आणि उत्तरप्रदेशात ५५ लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, यंदाच्या रब्बी हंगामात ११९.७२ लाख टन धानाच्या उत्पादनाचा अंदाज आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २४.४३ टक्के उत्पादन वाढून ९६.२१ लाख टन धान उत्पादन होईल, असा अंदाज केंद्र सरकारने वर्तवला आहे. 

हेही वाचा - आता १ नव्हे तर ४ वाजेपर्यंत सुरू राहणार दुकाने; सोमवारपासून होणार पुढील बदल

मागील वर्षी देशात धान्याचे २,९७५ लाख टन विक्रमी उत्पादन झाले होते. केंद्र सरकारच्या आकडेवारीप्रमाणे, देशात धानाचे १,२०३ लाख टन विक्रमी उत्पादन झाले होते. त्यापूर्वी म्हणजे २०१८-१९ मध्ये हे उत्पादन ११८८ लाख टन होते. यंदा गव्हाचे १०९२.४ लाख टन विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील वर्षी हे उत्पादन १०७६.६ लाख टन झाले होते. मात्र, पावसाने हजेरी लावल्याने गव्हाच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याने भाववाढीची शक्यता आहे असे नागपूर किरकोळ किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. 

नवीन हरभऱ्याची आवक मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून सुरू झालेली आहे. आवक वाढल्याने भावात घसरण झालेली आहे. गेल्या आठवड्यात हरभऱ्याच्या दरात प्रति टन १०० ते २०० रुपयांची घसरण झालेली आहे. येत्या दिवसात आवक वाढणार असल्याने पुन्हा भाव घटतील असे संकेत दिले जात आहे. यंदा हरभऱ्याचे उत्पादन किती होईल याबद्दल मतभेद आहेत. व्यापाऱ्यांनी ८२ ते ८५ लाख टन तर काही व्यापाऱ्यांनी ९५ लाख टन हरभऱ्याचे उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उत्पादन चांगले होणार असल्याने हरभरा डाळीचे भाव घटतील असेही बोलले जात आहे. 
 

loading image