esakal | Nagpur : चाकूच्या धाकावर पेट्रोल पंपावर दरोडा
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nagpur : चाकूच्या धाकावर पेट्रोल पंपावर दरोडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नेहमी गजबजलेल्या वर्धा रोडवरील उज्ज्वलनगरातील पेट्रोल पंपावर चार दरोडेखोरांनी दरोडा टाकला. तिघांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना कुऱ्हाड-चाकूचा धाक दाखवून काऊंटरमध्ये ठेवलेली २ लाख ३२ हजाराची रक्कम लुटून नेली. ही घटना सोमवारी मध्यरात्री १२ वाजता घडली. अगदी हाकेच्या अंतरावर सोनेगाव पोलिस स्टेशन असून दरोडा पडल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केल्या जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन राठोड यांचे उज्ज्वलनगरात इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे. सोमवारी नाईट शिफ्टवर आशिष पांडे आणि ब्रम्हानंद शुक्ला ड्यूटीवर होते. रात्री अकरा वाजता पेट्रोल पंप बंद केल्यानंतर कार्यालयात दोन्ही कर्मचारी आले. त्यांनी २ लाख ३० हजार रुपये काऊंटरमध्ये ठेवले आणि केबिनमध्ये जेवण करायला बसले. १२.२० वाजेदरम्यान तीन आरोपी हातात कुऱ्हाड आणि चाकू घेऊन कार्यालयात घुसले. दोघांनाही शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर काऊंटरमधील पैसे घेऊन तिघांनाही पळ काढला. काही अंतरावर चौथा आरोपी कार घेऊन उभा होता. कारमध्ये बसून चारही आरोपींनी नरेंद्रनगराकडे पळ काढला. पांडे आणि शुक्ला यांनी लगेच मालक रोहन राठोड आणि सोनेगाव पोलिसांना लूटमार झाल्याची माहिती दिली. पोलिसांचा ताफा पंपावर पोहचला. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: भारत कधीच अफगाणिस्तान होऊ शकत नाही कारण... - जावेद अख्तर

रेकी करून लूटमार

रात्री बारा वाजताच्या सुमारास पंपावरील कॅश कार्यालयात ठेवल्या जाते आणि फक्त दोनच कर्मचारी ड्यूटीवर असतात. ही माहिती लुटारूंना होती. त्यामुळे लूटमार करण्यापूर्वी काही दिवस आरोपींनी रेकी केली असावी, अशी शक्यता आहे. आरोपींनी कार नरेंद्रनगराकडे पळवली, परंतु समोर सीसीटीव्हीत ती कार दिसत नाही. त्यामुळे पोलिस संभ्रमात पडले आहेत.

सीसीटीव्ही फक्त नावासाठी

पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये नाईट व्हीजन नाही. त्यामुळे घटना घडली त्यावेळी अंधार असल्यामुळे आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. दोन्ही कर्मचारीसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहेत. टीपवरून ही लूटमार झाली का? या दिशेनेसुद्धा पोलिस तपास करीत आहेत.

loading image
go to top