एसबीआयची १४ कोटींनी फसवणूक

१२ कर्जधारक, एजंट, तीन बँक अधिकाऱ्यांना अटक, मुंबईतील दोन अधिकाऱ्यांच्या अटकेसाठी पथक रवाना
SBI bank
SBI bankesakal

चंद्रपूर : बिल्डर, एजंट आणि भारतीय स्टेट बॅँकेचे (एसबीआय) अधिकारी यांनी संगनमताने तब्बल ४४ जणांना मूल्यांकनापेक्षा अधिकचे कर्ज मिळवून दिले. यात एसबीआयची १४ कोटी २६ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार चंद्रपुरात घडला आहे. याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत १५ जणांना अटक केली आहे. त्यात एसबीआयचे दोन व्यवस्थापक, कर्मचारी, एजंट तथा कर्जदार यांचा समावेश आहे. दरम्यान, बँकेच्या मुंबईचे दोन आणि नागपूर शाखेतील एका अधिकाऱ्याच्या अटकेसाठी पथक रवाना झाले आहे. याप्रकरणी शहरातील डीएसके ग्रीन, सिनर्जी व देऊळ या बिल्डरांची नावे समोर येत आहेत.

चंद्रपूर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेचे क्षेत्रीय प्रबंधक संजोग अरुणकुमार भागवतकर यांच्याकडे ४४ कर्जधारकांनी गृह कर्ज घेण्यासाठी बनावट आयकर रिटर्न तयार करून एजंटमार्फत अर्ज सादर केले. या प्रकरणाची नियमानुसार पडताळणी न झाल्याने मूल्याकंनापेक्षा अधिकच्या कर्ज रकमेचे वाटप झाले. यात मजूर व छोट्या मोठ्या व्यवसायिकांना गृहकर्ज वितरित केले. ज्यांची क्षमता १० लाखाची होती. त्यांना ४० लाखांचे कर्ज वितरित केले गेले. कर्ज वाटपानंतरच्या तपासणीमध्ये बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बँकेची एकूण १४ कोटी २६ लाख ६१ हजार ७०० रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रार देण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी अधिक तपास केला असता, बनावट आयकर विवरण सादर केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी बँकेचे बापट नगर शाखेचे एटीएम व्यवस्थापक पंकजसिंग किशोरसिंग सोळंकी, कवठाळा बँकेचे व्यवस्थापक विनोद केशवराव लाटेलवार, मुख्य क्रेडीट व्यवस्थापक देविदास श्रीनिवासराव कुळकर्णी, अकोला या अधिकाऱ्यांसह, एजंट व कर्जधारकांना अटक करण्यात आली आहे. बँकेच्या दोन अधिकाऱ्यांच्या अटकेसाठी पथक मुंबईला रवाना झाले आहे, तर स्टेट बँकेच्या नागपूर मुख्य शाखेतील व्यवस्थापक उज्ज्वल शेळके फरार आहेत. या प्रकरणाचा तपास रामनगर आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

याप्रकरणात डीएसके ग्रिन, सिनर्जी वर्ल्ड व देऊळ बिल्डरसह नामांकित बिल्डरांची नावे समोर येत आहेत. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधिक्षक अतुल कुळकर्णी, आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दिपक मस्के अधिक तपास करित आहेत.

अटक केलेले कर्जधारक

या प्रकरणात आतापर्यंत श्वेता महेश रामटेके (वय ४२, रा.बाबूपेठ, व्यवसाय मजुरी), वंदना विजयकुमार बोरकर, (वय ४० रा.नगिनाबाग, व्यवसाय मजुरी), योजना शरद तिरणकर (वय ४२), डिएसके ग्रीन डुप्लेक्स, म्हाडा कॉलनी, शालिनी मनीष रामटेके (वय ४५ रा. भद्रावती), मनीषा विशाल बोरकर(वय ४० भद्रावती), वृंदा कवडू आत्राम (वय ४९ रा. डीएसके कॉलनी, बोर्डा, ), राहुल विनय रॉय (वय ३६ रा. माजरी), गजानन दिवाकर बंडावार (वय ३९ रा. धाबा), राकेशकुमार रामकिरण सिंग (वय ४२ सास्ती ), गणेश देवराव नैतमा (वय ३६ रा. कोसारा), गीता गंगादिन जागेट ( वय ५३ रा.घुग्घुस) यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना २३ व २४ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावल्यानंतर कारागृहात रवानगी केली आहे.

राष्ट्रवादीची तक्रार

राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी स्टेट बँकेच्या घोटाळ्याचे हे प्रकरण ४ जानेवारी २०२० मध्ये उघडकीस आणले होते. तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यवस्थापकासह बिल्डरवर कारवाईची मागणी केली होती. बँकेच्या अधिकाऱ्यांनी एका एजंटच्या मदतीने ७० ते ८० कोटीचे कर्ज कमिशनच्या स्वार्थापोटी बिल्डरांशी संगनमत करून चुकीच्या पद्धतीने वितरीत केले होते. तेव्हा बँकेचे अनेक खाते एनपीए (नॉन फर्मिंग अकाउंट )मध्ये गेले. त्यामुळे एसबीआयला मोठा आर्थिक फटका बसला. आर्थिक परिस्थितीनुसार १० ते १५ लाख रुपयाचे कर्ज मिळाला हवे अशा व्यक्तींना ३० ते ४० लाखाचे कर्ज बनावट कागदपत्रांच्या आधारे दिले गेले. या घोटाळ्याची तक्रार राजीव कक्कड यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली होती. सीबीआय व आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी, अशीही मागणी लावून धरली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com