
शरद पवारांना देशमुखांवर विश्वास तर पटोलेंच्या पक्षनिष्ठेवर शंका
नागपूर : तोंडी आरोप करणारे फरार आहेत. मात्र, त्यांच्या खोट्या आरोपांवर विश्वास ठेवून केंद्रीय तपास यंत्रणांनी माजी गृहमंत्र्यांना कोठडीत ठेवणे हा अन्यायच आहे. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची भक्कम पाठराखण केली. त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पक्षनिष्ठेवर शंका उपस्थित केली.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी अनिल देशमुख यांनी शंभर कोटी रुपये वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप केला. त्यामुळे त्यांना गृहमंत्रिपद सोडावे लागले. ईडी आणि प्राप्तिकर विभागाने त्यांच्या घरी, कार्यालयावर धाडी घातल्या. त्यांच्या नातेवाईकांनाही त्रास दिला. परमबीरसिंग यांना विचारणा केली असता त्यांनी वसुलीच्या सूचना दिल्या होत्या असे सांगितले. प्रत्यक्षात वसुली केली नाही असेही त्यांचे म्हणणे होते.
आरोप करणारे परमबीरसिंग फरार झालेत. ते आपले म्हणणे मांडायलाही समोर येत नाही. ते विदेशात पळून गेल्याची चर्चा आहे. ते कुठे आहेत हे आपणास माहिती नाही. मात्र, त्यांच्या आरोपांचा देशमुख यांना नाहक त्रास होत आहे. त्यांना ईडीने पोलिस कोठडीत ठेवले आहे. सध्या देशमुखांवर कायदेशीर कारवाई सुरू असल्याने याबाबत अधिक बोलता येणार नाही असेही शरद पवार यांनी सांगितले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील एकमेव दुकान बंद करू असे वक्तव्य केले होते. त्यावर शरद पवार यांनी त्यांनी विधानसभा व लोकसभेची यापूर्वी भाजपकडून निवडणूक लढवली होती याकडे लक्ष वेधले. त्यांची जबाबदारी आपण समजू शकता, असा टोला लगावून त्यांच्या पक्षनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.