esakal | पोळ्याला घात; बैल धुण्यासाठी गेलेल्या सहा तरुणांचा बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

पोळ्याला घात; बैल धुण्यासाठी गेलेल्या सहा तरुणांचा बुडून मृत्यू

पोळ्याला घात; बैल धुण्यासाठी गेलेल्या सहा तरुणांचा बुडून मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सोमवारी विदर्भात पोळा हा सण कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पोळ्यासाठी शेतकऱ्यांनी बैल धुतले. मात्र, हेच बैल धुत असताताना तलावावर गेलेल्या सहा तरुणांचा विदर्भातील वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडून मृत्यू झाला.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सांगळूद येथील दिवाकर समाधान सराटे (वय २९) हा युवक सोमवारी दुपारी तलावात बैल धुण्यासाठी गेला होता. मात्र, तलावामध्ये जास्त पाणी असल्याने व गाळात अडकल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. दिवाकर तलावात बुडाल्याचे कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. येवदा पोलिसांनी गावातील युवकांच्या मदतीने दिवाकरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. सदर घटनेमुळे नागरिकांनी आज पोळा न भरवण्याचा निर्णय घेतला. मृत दिवाकरच्या मागे आई-वडील व भाऊ-बहीण असा परिवार आहे.

हेही वाचा: नागपूर : कोरोनाची तिसरी लाट?, वीकएंड लॉकडाऊनची घोषणा

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील विरगव्हाण शिवारातील तलावात सोमवारी पोळ्यासाठी बैल धुवायला गेलेल्या सौरव नंदू कुबडे (वय २२) या शेतकऱ्‍याचा बुडून मृत्यू झाला. पोळ्यासाठी बैलांची तलावामध्ये अंघोळ घालत असताना अचानकपणे त्याचा तोल जाऊन तलावात बुडाला. सौरव कुबडेकडे तीन एकर शेती आहे. तसेच तो यवतमाळ येथील महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत होता. या घटनेमुळे विरगव्हाण गावावर शोककळा पसरली.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील माजी सरपंच निरंजन सुरवाडे यांचा मोठा मुलगा आशुतोष (वय २२) हा पोळा असल्याने रविवारी सकाळी १० वाजता बैल धुण्यासाठी गावाशेजारच्या कारेगाव शिवारातील तलावामध्ये मित्रांसोबत गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही बाब सोबतच्या मित्रांच्‍या लक्षात येताच त्‍यांनी आशुतोषला पाण्याबाहेर काढले व खामगाव येथील सामान्‍य रुग्‍णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. त्‍याच्‍या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा: रात्रभर विहिरीत राहिला युवक जिवंत; दुसऱ्यादिवशी काढले बाहेर

अकोला तालुक्यातील कानशिवनी येथील चार युवक बैल धुण्यासाठी काटेपूर्णा-पिजंर्डा नदीच्या संगमावर सोमवारी सकाळी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले. ते पाहून गावकऱ्यांनी दोघांना वाचविले. मात्र. दोघे प्रवाहात वाहून गेले. गोपाल कांबे व सागर कावरे असे वाहून गेलेल्या तरुणांची नाव आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. आगर (जि. अकोला) येथील ब्रिटिशकालीन तलावात सोमवारी दुपारी मनोज मुरलीधर खांडे (२२) हा युवक बैल धूत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तलावात पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

loading image
go to top