esakal | ऑनलाइन शिक्षणासंदर्भात चिमुकलीने मुख्याध्यापकांना लिहिले पत्र; सर...
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाइन शिक्षणासंदर्भात चिमुकलीने मुख्याध्यापकांना लिहिले पत्र; सर...

ऑनलाइन शिक्षणासंदर्भात चिमुकलीने मुख्याध्यापकांना लिहिले पत्र; सर...

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : कोरोनाबद्दल आता कुणाला काहीही सांगायची गरज नाही. जवळपास दीड वर्षांपासून थैमान घालणाऱ्या या विषाणूने अनेकांचा संसार उद्ध्वस्त केला आहे. अनेकांना बेरोजगार केले आहे. या कठीण काळात एक एक दिवस काढणे कठीण जात आहे. मित्र, परिचित, नातेवाईकही मदतीसाठी पुढे येत नाही. अशात गरीब कुटुंबातील मुलांनी ऑनलाइन शिक्षणाचा खर्च कसा उचलायचा, हा यक्ष प्रश्न आहे. याच प्रश्नाला सामोरे जाणाऱ्या एका चिमुकलीने मुख्याध्यापकांना भावनिक पत्र लिहिले आहे. इशिका भाजे असे चिमुकलीचे नाव आहे. (Small-girl-wrote-a-letter-to-the-headmaster-for-online-education)

इशिका भाजे ही अकरा वर्षांची आहे. ती नरसाळा येथील श्री सत्यसाई विद्यामंदिरात सहाव्या वर्गात शिकते. तिला एक मोठा भाऊ आहे. तो बारावीत शिकतो. दोघेही नरसाळा येथे आईच्या आई-वडिलांकडे राहतात. मात्र, कोरोनामुळे त्यांच्यावर कठीण वेळ आली आहे. मावशी आणि काकाची नोकरी गेल्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेण्यात अडचण येत आहे. घरची ही परिस्थिती पाहून इशिकाने मुख्याध्यापकांना मदतीसाठी पत्र लिहिले आहे.

हेही वाचा: भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचे "दादा "?

पत्रात तिने ‘‘आम्ही दोघ बहीण-भाऊ आहोत. ऑनलाइन शिक्षणासाठी आम्हाला दोन मोबाईल घेऊन दिले आहेत. दोन्ही मोबाईलला महिन्याला ८०० ते १,००० रुपयांचा खर्च येतो. इतका खर्च करूनही इंटरनेट पॅक कमी पडतो. शाळेत शिकताना इतका खर्च येत नव्हता. हा खर्च करणे आम्हाला शक्य नाही. सर, परवडेल अशी उपाययोजना करावी. शाळेकडून काही होत नसेल तर सरकारकडून मदत होईल का? हे बघावे. जेणे करून माझ्यासारख्या अन्य विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटेल, ही नम्र विनंती.’’ असा मजकूर लिहिला आहे. तिच्या पत्राची मुख्याध्यापकांनी दखल घेतली आणि शाळेने तिचे पालकत्व स्वीकारले. यापुढील तिच्या शिक्षणाचा खर्च शाळाच करणार आहे. या कार्यात इतर शिक्षकही मदत करणार आहे. यामुळे इशिकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

आजी-आजोबा करतात सांभाळ

इशिका दोन वर्षांची असताना आईचे निधन झाले. आईच्या निधनानंतर आजी-आजोबा तिचा व भावाचा सांभाळ करतात. इशिकाच्या आजोबांना पेन्शन मिळते. मात्र, मुलगी आणि जावयांची नोकरी गेल्याने ऑनलाइन शिक्षणाचा खर्च उचलणे त्यांना कठीण जात आहे. या कठीण काळातही त्यांनी इशिकाची साथ सोडली नाही.

हेही वाचा: महिलेचा जीव गेला अन् पडले पितळ उघडे; वाढोणा कोरोनामुक्त कसा?

विद्यार्थी कमी झाल्याने आला संशय

जवळपास दीड वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात ऑनलाइन वर्गाला विद्यार्थ्यांची उपस्थिती राहत होती. कालांतराने विद्यार्थ्यांची संख्या कमी व्हायला लागली. यामुळे शाळेतील अन्य शिक्षकांना याचे कारण शोधायला सांगितले. यात अनेकांच्या आई-वडिलांचे कमाईचे साधन गेल्याचे समोर आले. त्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाला गैरहजर राहत असल्याचे पुढे आल्याचे मुख्याध्यापक नीलेश सोनटक्के यांनी सांगितले.

नीलेश सोनटक्के

नीलेश सोनटक्के

कोरोनामुळे अनेकांची अडचण होत आहे. शाळाही ऑनलाइन सुरू आहे. मात्र, अनेक पाल्यांच्या आई-वडिलांचा रोजगार हिरावल्या गेल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे कठीण जात आहे. ही परिस्थिती लवकर सुधारेल असे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे सरकारने अशा मुलांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच शाळेने अशा मुलांचे पालकत्व स्वीकाराने. सामाजिक संस्थांनीही पुढे येऊन मदतीचा हात द्यावा. जेणे करून इशिका सारख्या लहान मुलांच्या भविष्याचे नुकसान होणार नाही.
- नीलेश सोनटक्के, मुख्याध्यापक, श्री सत्यसाई विद्यामंदिर

हेही वाचा: प्रेयसीच्या अत्याचाराची चित्रफीत टाकली फेसबुकवर; चंद्रपुरातील घटना

महागाई चांगलीच वाढली आहे. रिचार्जही महागले आहे. आमची परिस्थिती नसल्याने अडचण जात होती. मात्र, आता शाळा शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याने समस्या सुटली आहे.
- इशिका भाजे, विद्यार्थिनी

(Small-girl-wrote-a-letter-to-the-headmaster-for-online-education)

loading image
go to top