गाव लई न्यारं... महिला खुर्चीवर बसून पितात चहा अन्‌ पतीला मागतात जेवणाचे ताट

Special women's day in vihirgao at Nagpur
Special women's day in vihirgao at Nagpur

नागपूर : सकाळ होताच गावात नित्यक्रमाने प्रत्येकजण आपापल्या कामात लागतो. वर्षभर हेच दृष्य दिसते. परंतु, एक दिवस मात्र नेहमीपेक्षा वेगळा असतो. या दिवशी घरासह बाहेरची सर्व कामे पुरुष करतात. यामध्ये केर काढणे, साफसफाई, मुलांची तयारी आणि पहाटेच्या चहापासून ते रात्रीच्या स्वयंपाकापर्यंत जेवढी कामे असतील ती पुरुष करतात. तेही आढेवेढे न घेता खेळीमेळीच्या वातावरणात. हे घडते उमरेड मार्गावरील विहीरगाव येथे मागील चार वर्षांपासून साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक महिला दिनी. 

गावाची लोकसंख्या बाराशे ते तेराशे. येथील काही स्त्रियांनी एकत्र येऊन महिला राजसत्ता अभियानास सुरवात केली. महिलांचे अधिकार आणि कर्तव्य यासंदर्भाने जागरुकता वाढविणे व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अधिकाधिक महिलांना कसे आणता येईल याबद्दल या अभियानातून प्रयत्न केले. हे करीत असताना पोळ्याला एक दिवस का होईना बैलांना आराम दिला जातो, त्यांची काळजी घेतली जाते मग दिवसरात्र राब राब राबणाऱ्या महिलांनाही एखादा दिवस आराम का नको हा विचार अभियानातील महिला सदस्यांच्या मनात आला.

त्यांनी याविषयी चर्चा केली. त्यांना समजले की जागतिक पातळीवर आठ मार्चला महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. मग काय, या दिवशी असे काय करता येईल की हा दिवस महिलांच्या आयुष्यात एक वेगळाच दिवस म्हणून कायम स्मरणात राहील यादिशेने पुढील विचार सुरू झाले. एक दिवस महिलांची सर्व कामे पुरुषांनी करायची यावर शिक्कामोर्तब झाले. गावातील जुन्या जाणत्या, वडिलधाऱ्यांना याबाबतीत माहिती देण्यात आली. घरातील कर्त्या माणसांसोबत चर्चा करून त्यांना या अभिनव उपक्रमाबद्दल राजी करण्यात आले. 

'एक उनाड दिवस'

काहींनी प्रारंभी या उपक्रमाला हास्यास्पद ठरविले. हळुहळू त्यांनीही या उपक्रमात भाग घेऊन एक दिवस महिलांच्या नावे केला. मागील चार वर्षांपासून या गावातील पुरुष जागतिक महिला दिनी घरातील सगळ्या कामांची धुरा आपल्या खांद्यावर घेतात. अशाप्रकारे एक दिवस का होईना महिलांना पुरुषांसारखे खुर्चीवर बसून चहा पिता येतो, प्रेमाने हाक देऊन जेवण नवऱ्याकडून बोलविता येते. वर्षातील "एक उनाड दिवस' कोणतेही घरकामाचे टेन्शन न घेता घालवता येतो. 

त्यांच्या कार्याला सन्मान
पत्नी, माता, भगिनीच्या रूपात महिला आपले सर्वस्व कुटुंबीयांसाठी देतात. त्यांना किमान एक दिवस तरी आराम मिळावा, त्यांची कामे पुरुषांनी करून त्यांच्या कार्याला सन्मान द्यावा हा माफक उद्देश संयुक्त चूल मालकी अभियानाचा आहे. गावातील पुरुषांनीही या अभियानात सक्रिय भाग घेऊन महिलांप्रती आदरभाव दाखवतात. 
- पुष्पा बनकर, 
सदस्य, संयुक्त चूल मालकी अभियान.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com