नागपूर : तीन अधिकाऱ्यांसह आठ कर्मचारी निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST stike news three official and 8 worker suspended second major action after Belsare msrtc nagpur

नागपूर : तीन अधिकाऱ्यांसह आठ कर्मचारी निलंबित

नागपूर : एसटीचे कर्मचारी संपावर असताना त्यांचे संपकाळातील वेतन काढणे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले. महामंडळ प्रशासनाने तत्कालीन विभागीय नियंत्रक नीलेशे बेलसरे यांच्या पाठोपाठ आज, शुक्रवारला आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी निलंबित झाल्याने एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात खळबळ माजली असून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

नागपूर विभागातून निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी शैलेश भारती, आस्थापना पर्यवेक्षक सुभाष रंगारी आणि आस्थापना पर्यवेक्षक उल्हास घुई या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे लिपिक वर्गामध्ये सुरज कोहड, ईखार, लाड, भाग्यश्री आमले आणि महिला लिपिक नंदेश्वर यांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

संपात सहभाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासह इतरही काही कामावर ठपका ठेवत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ने या ८ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. संपामुळे महामंडळ मुख्यालयाने काही अंतर्गत तर काही उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आदेश काढत विभाग नियंत्रकांना त्यांचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार संपकर्त्यांना आंदोलन काळातील वेतन द्यायचे नव्हते. अकोला नंतर नागपूर विभागीय कार्यालय हद्दीतील २० कर्मचाऱ्यांना संप कालावधीतील शिल्लक सुटीचे वेतन देण्यात आले. संपादरम्यान महामंडळाकडून राज्यातील विभाग नियंत्रक कार्यालयांना वेळोवेळी मार्गदर्शक सूचना दिल्या जात होत्या.

त्यात संपकाळातील कर्मचाऱ्यांना वेतन न देण्याचे स्पष्ट आदेश होते. मात्र, अकोला नंतर नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाने सुद्धा २० कर्मचाऱ्यांना संपापूर्वीच्या शिल्लक रजेचे वेतन दिले. यात संपातील डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे वेतन सुद्धा समाविष्ट आहे. महामंडळाचे आर्थिक नुकसान आणि वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष असा ठपका ठेवत विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे यांना काही दिवसापूर्वी निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागेवर गजानन नागुलवार यांना पदभार देण्यात आला. अकोला विभागीय नियंत्रकानंतर प्रशासनाने नागपूर विभागीय नियंत्रकाला चौकशीअंती निलंबित केले. त्यानंतर पुन्हा आज, शुक्रवारी ८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लिपिक वर्गातील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे अधिकार विभागीय नियंत्रक यांच्या अंतर्गत आहे. मात्र, त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बैठकीत असल्याचे सांगून वेळ मारून घेतली.

अकोला, नागपूरनंतर आता भंडारा, गडचिरोली?

याच प्रकरणात पूर्वी अकोला आणि नागपूर विभागीय नियंत्रकांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली होती. आता नागपूर विभागातून ८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अकोला, नागपूर नंतर आता भंडारा आणि गडचिरोली विभागीय कार्यालयाचा नंबर लागू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Web Title: St Stike News Three Official And 8 Worker Suspended Second Major Action After Belsare Msrtc Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top