esakal | नागपूरचे नगरसेवक तुकाराम मुंढेंना म्हणाले, आम्ही चोर, गुंड आहोत काय?

बोलून बातमी शोधा

tukaram mundhe
नागपूरचे नगरसेवक तुकाराम मुंढेंना म्हणाले, आम्ही चोर, गुंड आहोत काय?
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे यांना भेटायला जाताना सुरुवातीलाच सुरक्षारक्षकांनी रोखल्याने नगरसेवकांचा तिळपापड झाला. चर्चेदरम्यान आयुक्तांच्या मागे पोलिस अधिकारी, सुरक्षारक्षकांचा गराडा पाहून नगरसेवकांनी संताप व्यक्त करीत "आम्ही चोर, गुंड आहोत काय?' अशा शब्दात आयुक्तांना खडे बोल सुनावले. त्यानंतर आयुक्तांनी सुरक्षारक्षक, पोलिसांना बाहेर थांबण्यास सांगितले. मात्र, विकासकामावरून नगरसेवकांचा संताप चर्चेनंतरही कायम होता. 

आयुक्तांनी दिलेल्या वेळेनुसार सत्ताधारी नगरसेवक बाजूच्या कक्षात जात असताना तेथील सुरक्षारक्षकांनी रोखले. यावेळी सर्वच नगरसेवक सुरक्षारक्षकांवर ओरडले. आयुक्तांसोबत नगरसेवकांची चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू असताना आयुक्तांभोवती पोलिस, सुरक्षारक्षक उभे होते. सत्तापक्षनेते संदीप जाधव आयुक्तांसोबत मालमत्ता कर थकीत असून वसुलीची जबाबदारी कुणाची? यावर चर्चा करीत होते.

त्याचवेळी उभे पोलिस व सुरक्षारक्षकांवरून नगरसेवकांनी आयुक्तांना लक्ष्य केले. "पोलिस, सुरक्षारक्षकांना बाहेर हाकला. आम्ही चोर, गुंड, गुन्हेगार आहोत काय?' असा सवाल करीत नगरसेवकांनी त्यांना बाहेर काढण्याची मागणी केली. "हा नगरसेवकांवर अविश्‍वास आहे. तुमचा आमच्यावर विश्‍वास असायला पाहिजे, महापालिकेत यापूर्वी कधीही असे घडले नाही. बाहेर काढा पोलिसांना', असा आवाज यावेळी सुनील अग्रवाल यांनी चढविला. त्यानंतर आयुक्तांना पोलिस, सुरक्षारक्षकांना बाहेर थांबण्यास सांगितले. 

मुख्याध्यापक विद्यार्थिनीला बोलवायचा एकांतात.... अखेर मिळाला न्याय


नगरसेवकांना वेळ न देणे योग्य नाही : तिवारी 
आपण नगरसेवकांना वेळ देत नाही. त्यामुळे 112 नगरसेवकांना एकत्र यावे लागले. नगरसेवकांना भेटण्यास आपल्याला वेळ नाही. हे योग्य आहे काय? असा सवाल दयाशंकर तिवारी यांनी आयुक्तांना केला. आयुक्तांनी यावेळी मी आतापर्यंत अनेक नगरसेवकांना भेटलो, असे सांगितले. नगरसेवकांना भेटण्यासाठी एक तासिका ठरवावी, अशी मागणी तिवारी यांनी केली. 

पाणी घेण्यासाठी उतरल्या प्लॅटफॉर्मवर आणि चढताना झाला घात

- आयुक्त व नगरसेवक संभाषणातील संपादित प्रमुख मुद्दे 

सत्तापक्षनेते संदीप जाधव : 112 नगरसेवकांना पंधरा मिनिटांची फार अपुरी आहे. आम्ही येत असताना सुरक्षारक्षकांनी रोखले. ही चुकीची बाब आहे. 
आयुक्त मुंढे : शिष्टमंडळाचे प्रतिनिधी भेटायला येतात. या कक्षात 25 खुर्च्या प्रतिनिधी मंडळासाठी पुरेशा आहेत. 
वीरेंद्र कुकरेजा : स्थायी समिती हॉल किंवा 155 नगरसेवकांच्या बसण्याचीही सुविधा असलेले नगरभवन आहे. 
आयुक्त मुंढे : ही काही सर्वसाधारण सभा नाही. 
डॉ. रवींद्र भोयर : आपण इतिहास घडवून राहिले. नगरसेवकांना भेटण्याची वेळ मागावी लागते. 
आयुक्त मुंढे : मला काही कामे असतात. 
सर्व नगरसेवक : आपल्याला कामे असतात, नगरसेवक रिकामे आहेत काय? 
दयाशंकर तिवारी : आपण नगरसेवकांना वेळ देत नाही म्हणून सर्वांना एकत्र यावे लागले. आपल्याला नगरसेवकांना भेटण्यास वेळ नाही, हे काय योग्य आहे काय? 
आयुक्त मुंढे : मी सर्वांना भेटत आहे. अनेकांना भेटलो. 
तिवारी : नगरसेवकांना भेटण्यासाठी एक तासिका ठरवावी. एका तासात भेटू आपण 
दटके : आपण सभागृहातही बोलले निधी नाही, निधी कसा कॅरी फारवर्ड होते, हे समजून घ्यावे, जे योग्य आहे ते करावे. 
आयुक्त : महापालिकेला देणी आहे, आता कामे सुरू करणार पुन्हा देणी वाढणार. 
दटके : वेळच्यावेळी जीपीएफ भरला असता ती देणी थांबली नसती. त्याचे नुकसान आम्ही का सोसावे? 
आयुक्त : तुम्ही सांगितले म्हणून पीपीएफ, आयकर भरला नाही, असे मी म्हटलं नाही. 
सर्व नगरसवेक : विकासकामे थांबवू नये. 
आयुक्त : लिगल देणी पावणेदोनशे कोटींची आहेत. जुन्या कामाच्याही देणी आहेत. ते दुसऱ्या कुणावर ढकलणार का? याचाही विचार करायला हवा. 
सर्व नगरसेवक : यावर्षी देणी झाली नाही तर काम होणार नाही. तुम्ही आल्यानंतरच विकासकामे कशी थांबली? 
जाधव : एवढ्या वर्षांपासून कर थकीत आहे. ते वसूल करण्याची कुणाची जबाबदारी होती? 
डॉ. भोयर : तुम्ही एका चाकाने गाडा हाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची तुमची प्रतिमा तयार झाली आहे. 
आयुक्त : असे कुठलेही वक्तव्य मी केले नाही. 
प्रकाश भोयर : साहेब आपण खासदार फंडातील कामे थांबविली. या कामाचा मनपाशी कुठे संबंध आहे? 
आयुक्त : जो शासनाचा निधी आहे, खासदाराचा निधी आहे ती कामे होतील. 
प्रा. दिलीप दिवे : इंग्रजी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव सभागृहाने मंजूर केला. ही फाईल तुम्ही का थांबवली? 
आयुक्त : आपण सीबीएससी केल्या पाहिजे, असे माझ मत आहे. तुम्ही गैरसमज करून घेत आहे. 
नगरसेवक : ही बाब तुम्ही शिक्षण सभापतीला सांगायला पाहिजे नाही, तुमची संवादची समस्या आहे. 
दयाशंकर तिवारी : सिवेज लाइन, डांबरीकरण, नाले, ड्रेनेज, अनधिकृत लेआउटमध्ये रस्ते ही सर्व फाइल रोखणार असाल तर नगरसेवकांचा जनतेत अपमान होईल. आता संभ्रमाची स्थिती आहे. 
आयुक्त : काहीही संभ्रम नाही. 
दयाशंकर : संभ्रम आहेच. 
आयुक्त : मी कधीच म्हटले नाही की कामे आवश्‍यक नाही, मी फक्त आर्थिक स्थितीवर बोललो. 
दटके : सर्वांनीच आपापले म्हणणे मांडले. आपल्यासाठी सभागृह आहे. 
आयुक्त : उत्पन्न कमी असेल तर प्राधान्य ठरवावे लागते. हे माझे धोरण आहे, यात कुठेही संभ्रम नाही. 
दटके : प्राधान्य ठरविताना तुम्ही संबंधित पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली पाहिजे. उद्या संवाद न झाल्यास दुष्परिणाम महापालिकेवर होईल, याची काळजी आपण घ्यावी.