esakal | Ngapur : झोपडपट्टीवासीयांचे छतही नाही सुरक्षित
sakal

बोलून बातमी शोधा

Slum

झोपडपट्टीवासीयांचे छतही नाही सुरक्षित

sakal_logo
By
केवल जीवनतारे ः @kewalsakal

इंदिरानगर : सर्वांसाठी सारखाच प्रकाश देणारा सूर्य एकच. मात्र नागपूरच्या भूमीत बंगला, फ्लॅट स्कीम, सोसायटी, वस्ती आणि झोपडपट्टीतील नागरी चित्र नजरेसमोर आणल्यास विदारक वास्तव दिसते. झोपडपट्ट्यांमध्ये हातभट्टीची दिसते. तर सोसायट्यांमध्ये व्हिस्की...असे लईच फरक दिसून येतात. झोपडपट्टी आणि पाश वस्ती असा शेजारधर्म असला तरी झोपडपट्टीवाल्यांच्या वाट्याले आगच आग येते. माथ्यावर सूर्याची अन्‌ पोटात भुकेची आग. दोन वेळच्या अन्नासाठी घाम गाळणाऱ्या झोपडपट्टीवासीयांच्या डोक्यावरचं छतही सुरक्षित नाही. मागील ३०-३५ वर्षांपासून मालकी हक्काचे पट्टे मागण्यात हयात गेल्यानंतरही निगरगट्ट प्रशासन झोप उघडत नाही. तर आमदारांपासून तर नगरसेवक झोपडीतील माणसांच्या मतांवर डोळा ठेवून आपले राजकीय पोळी भाजून घेतात.

तीस लाखांच्या नागपूर शहरात साडेचारशेच्यावर झोपडपट्ट्या आहेत. यातील सर्वाधिक १०२ झोपडपट्ट्या एकट्या उत्तर नागपुरात आहेत. झोपडपट्ट्यांची श्रीमंती उत्तर नागपुरात आहे. मात्र या झोपडपट्ट्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. शहरातील सर्व झोपडपट्ट्या या महापालिका, नझुल, महसुल, मालिक मौजा आणि रेल्वेच्या जागांवर वसलेल्या आहेत. यामुळे या अधिकृत असलेल्या झोपडपट्टीवासीयांना पट्टे देण्याची जबाबदारी जागा मालकांची आहे. मालकी हक्काचे पट्टे देण्यासंदर्भात महापालिकेने २००० पूर्वी आरची नोव्हा डिझाईन इंक या एजन्सीतर्फे प्लेन टेबल सर्वे केला. पीटीएस नकाशे काढले. स्लम घोषित करून महापालिकेने सर्वेक्षण करा या आशयाचे पत्र पाठवले. मात्र कोणीही दखल घेतली नाही.

बापूकुटीपासून तर जोशीपुरा झोपडपट्टीतून एकात्मता

शहरात २९९ अधिकृत तर १२७ अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत. यापैकी उत्तर नागपुरात १०२ झोपडपट्ट्या आहेत. त्यातील ५९ अधिकृत झोपडपट्ट्या आहेत. आणि ४३ झोपडपट्ट्या अनधिकृत आहेत. उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक १ मधील इंदिरानगर आणि कस्तुरबानगरातील १३८ झोपड्यांतील रहिवाशांनाच पट्टे देण्यात आले आहेत. यामुळे कधी प्रशासनाच्या पोटात दुखेल आणि कधी कोणत्या झोपडपट्टीवर बुलडोझर चालेल, हे सांगणे कठीण आहे.

केवळ प्रभाग क्रमांक ६ मधील अधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये खोब्रागडेनगर, आदर्शनगर, पंचशीलनगर-१, पंचशीलनगर-२, बापुकूटी, जोशीपुरा, सोनार टोली, विनाकी टेकडा, बाबा बुद्धनगर, ताजनगरचा समावेश आहे. मात्र येथील एक हजारपेक्षा अधिक घरे असलेल्या झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले नाही. या प्रभागात बापुकूटी आणि जोशीपूरा अशा नावाने असलेल्या झोपडपट्ट्यांतून एकात्मता जोपासली असल्याचे दिसून येते.

तोपर्यंत झोपडपट्ट्या असुरक्षित

महापालिका झोपडपट्टीवासियांकडून मालमत्ता कर, सफाई कर व पाणी कर वसुल करते. परंतु मालकी हक्काचे पट्टे देत नाही. जोपर्यंत या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देत नाही, तोपर्यंत या झोपड्या असुरक्षित आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधील लोकप्रतिनिधींनी झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळवून देण्यासाठी कधीही आंदोलन केले नाही. येणाऱ्या काळात कधीही अनधिकृत झोपड्यांवर बुलडोजर चालवणारा निर्णय हे सरकार घेऊ शकते. सर्व झोपडपट्टी वसाहतीतील रहिवाशांचे अर्ज व दस्तऐवज जिल्हाधिकारी, नझूल कार्यालयात प्रलंबित आहेत. उत्तरचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी उत्तर नागपुरातील स्लमधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी पुढाकार घ्यावा. झोपडपट्टी बचाओ अभियान आम्ही हाती घेणार आहोत.

-अविनाश धमगाये, सामाजिक कार्यकर्ते.

loading image
go to top