esakal | आयपीएस अधिकाऱ्यांच्या बंगल्यात धाडसी चोरी, दोन चोरट्यांना केली अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बंगल्यात धाडसी चोरी, दोन चोरट्यांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूर शहर पोलिस (nagpur city police) दलातील आयपीएस अधिकारी नुरूल हसन यांच्या निवासस्थानात चक्क चोरटे घुसले. त्यांनी चंदनाचे झाड कापून चोरी केले. थेट आयपीएस अधिकाऱ्याच्या घरात चोरी झाल्यामुळे पोलिस यंत्रणा झपाट्याने कामाला लागली. सदर पोलिसांनी दोन्ही चोरट्यांचा शोध घेऊन अटक केली. राजेश ऊर्फ राजा केशवराव गुजरवार (३४, गोन्ही, ता. काटोल) आणि रूपेश गोकुल मुरडिया (२८, वाढोणा, ता. काटोल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (theft in IPS officer house in nagpur)

हेही वाचा: दोन ‘हायफाय’ सेक्स रॅकेटवर छापा; चार युवतींची सुटका

पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांचे सिव्हिल लाईन येथे निवासस्थान आहे. त्यांच्या घरी रात्रंदिवस सुरक्षा रक्षक असतात. तरीही सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून १२ जुलैच्या रात्री चोरट्यांनी बंगल्याच्या मागे असलेले चंदनाचे झाड चोरून नेले होते. याप्रकरणी पोलिस हवालदार रवींद्र चिचघाटे (५५) यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. सुरक्षा यंत्रणेला छेद देऊन चोरांनी चोरी केल्याने एकच खळबळ उडाली होती.

चंदनाची झाडे चोरून नेणारे प्रामुख्याने कुठे राहतात? याचा शोध पोलिसांनी लावला. काटोल तालुक्यातील गोन्ही या गावात चंदनचोर राहतात अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी गोन्ही गावावर आपले लक्ष केंद्रित केले. त्यात घटनेच्या दिवशी आरोपी राजेश, रूपेश आणि फरार आरोपी ओमप्रकाश ऊर्फ सचिन तेजराम गुजरवार (३०) हे गावात नव्हते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्याचप्रमाणे तिघांच्याही मोबाईलचे लोकेशन घेतले असता घटनेच्या दिवशी त्यांचे मोबाईल बंद असल्याचे दिसून आले. त्यावरून तिघांवरही पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी राजेश आणि रूपेश यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून साडेपाच किलो चंदनाच्या काड्या जप्त केल्या. ही कारवाई सदर पोलिस ठाण्यातील कर्मचारी सुधीर मडावी, आशिष बहाळ आणि रूपेश हिवराळे यांनी केली.

सामान्य नागरिक किती सुरक्षित? -

जर डीसीपी दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या घरात पोलिस बंदोबस्त असतानासुद्धा चोरी होऊ शकते, तर शहरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांचे काय स्थिती असेल? असा सवाल यावेळी निर्माण होत आहे. शहरात नव्याने संरचना करीत बीट मार्शल तयार करण्यात आले आहेत. तरीही चोरी-घरफोडीच्या घटनांवर शहरात नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.

loading image
go to top