कॉरिडॉर विकासानंतरच 'ज्ञानगंगे'त वाघीण सोडा, लालफितशाहीत अडकला समितीचा अहवाल

tigress will lived after corridor in dyanganga wildlife sanctuary
tigress will lived after corridor in dyanganga wildlife sanctuary

नागपूर : तीन हजार किमीचा प्रवास करून स्थिरावलेल्या 'वॉकर' या वाघाने ज्ञानगंगा अभयारण्यात अधिवास निवडला आहे. मात्र, या वाघाच्या दूरगामी संवर्धनाच्या दृष्टीने जंगलाची संलग्नतेचा मुद्दा मार्गी लावावा लागणार आहे. त्यासाठी तीन कॉरिडॉर जोडणे काळाची गरज आहे. तज्ज्ञ समितीने असा अहवाल दिला असला तरी तो लालफित शाहीत अडकला असल्याची माहिती पुढे आली आहे. 

देशातच नव्हे तर राज्यातही वाघांची संख्या झपाट्याने वाढत असताना वाघ आणि त्यांच्या अधिवास संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील जंगलात अजून वाघ सामावू शकतात. तुकड्यामध्ये विभागलेल्या जंगलांची संलग्नता खंडीत झालेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील या वाघाने महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला आहे. सुमारे तीन वर्षांच्या या वाघासाठी जोडीदाराचा शोध सुरू आहे. या वाघाची वंशवळ वाढण्यासाठी या क्षेत्रात वाघीण सोडली तरीही आवश्यक त्या प्राथमिक सुविधा करणे गरजेचे आहे. एका वाघासाठी जोडीदार शोधून कॉरिडॉर निर्मिती, त्या परिसरातील गावाचे पुनर्वसन व महामार्गावरील रात्रीची रहदारी बंद करणे गरजेचे आहे. याशिवाय इतर सुविधा वनखात्याने निर्माण केल्यास संरक्षण, संवर्धनाचा केंद्रबिंदू ठरवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पहिले पाऊल ठरेल. 

ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावल्यानंतर या वाघाने २०५ चौरस किमीचा अधिवास निवडला आहे. तृणभक्षी प्राण्यांची तो शिकार करत आहे. याठिकाणी आता त्याची वंशवळ वाढवण्यासाठी वाघीण सोडण्याचा प्रयत्नात आहेत. या वाघावर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती त्यावर लक्ष ठेवून आहे. त्यांनी याठिकाणी वाघीण सोडण्याची शिफारस केली आहे. मात्र, हे अभयारण्याची संलग्नता खंडीत झाल्याने ते बेटासारखे आहे. या अभयारण्याची संलग्नता अकोला जिल्ह्यातील काटेपुर्णा, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी, बोथा वनक्षेत्र आणि अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या वाघांचा अधिवास असलेल्या क्षेत्राशी संपर्क तुटलेला आहे. कॉरिडॉरच्या माध्यमातून तो जोडला जाऊ शकतो. हा भाग जोडल्यानंतर वाघिणीला सोडल्यास त्या परिसरात त्या वाघाची वंशवळ वाढणार आहे. त्यामुळे वाघांची संख्या वाढल्याने 'वॉकर'च्या रुपाने ज्ञानगंगा अभयारण्याचा विकास आणि त्या अनुषंगाने पर्यटन वाढणार असल्याने स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. त्यासाठी उपवनसंरक्षक, बुलडाणा जिल्हाधिकारी आणि खासदार प्रतापराव जाधव यांची संयुक्त बैठक तातडीने होणे काळाची गरज आहे. त्यातून कॉरिडोरचा प्रश्न मार्गी लागल्यास हे व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 

ज्ञानगंगा अभयारण्याच्या काही मर्यादा आहेत. ते अभयारण्य एका बेटासारखे आहे. त्यामुळे त्या अभयारण्यांची संलग्नता जोडण्यासाठी कॉरिडॉर तयार करणे हा पहिला टप्पा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी वाघिणीला सोडता येणार आहे. तसा समितीने अहवालही दिलेला आहे. मात्र, अद्यापही त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. 
-किशोर रिठे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com