तूर, हरभरा डाळीच्या दरात घसरण; गरिबाघरी बनणार पुरणपोळी

Tur and gram pulses falling in price
Tur and gram pulses falling in price

नागपूर : तूर डाळीची वाढलेली आवक आणि हरभरा डाळीला मागणी नसल्याने पंधरा दिवसांत दोन्ही डाळींच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे लक्ष्मी पूजनाला घरोघरी शिजणारी पुरणपोळीची चव गोड झाली आहे. सण आणि उत्सव सुरू झाल्यानंतर बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसत आहे. मात्र, ग्राहकही गरजेनुसार वस्तूंची खरेदी करीत असल्याने डाळींची मागणी कमी झाली. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या महिन्यात डाळीच्या दरात विक्रमी भाव वाढ झाल्याने तूरडाळ ११० ते ११५ रुपये किलोवर तर हरभरा डाळ ८५ ते ९५ रुपये किलोवर पोहोचली होती. ऐन सणासुदीत भाववाढ झाल्याने दोन्ही डाळी खरेदी करण्यासाठी अधिक खिसा हलका करावा लागणार होता. तुरीच्या आयातीसाठी दालमिलला केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारे परवाने कोरोना काळात तीन महिने थांबवून ठेवल्याने बाजारात तूरडाळीचा तुटवडा निर्माण झाला.

पुरवठा आणि मागणीत बरीच तफावत निर्माण झाल्याने भाववाढ झाली होती. भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने तुरीची आयात आणि नाफेडच्या साठ्यातून ३.५ लाख टन तूर खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तुरीच्या भावात प्रतिकिलो २५ रुपयांची घसरण होऊन भाव ९,५०० रुपयांवर स्थिरावले. पंधरा दिवसांत तूर डाळ प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांनी घसरली.

सरकार तीन लाख तुरीच्या आयातीसाठी परवाने जारी करणार आहे. परवाने जारी केल्यानंतर आयातीसाठी जवळपास दीड ते दोन महिने लागतील. डिसेंबरअखेर नवीन तूर बाजारात येईल. सरकारच्या निर्णयानंतर भाववाढीवर लगाम लागला. दीड महिन्यात हरभरा डाळीचे भाव क्विटंलमागे २ हजार रुपयांनी वाढून ७५ ते ८० रुपये किलोवर पोहोचले.

मात्र, बाजारात ग्राहकांचा अभाव असल्याने हरभरा डाळीच्या दरात प्रतिकिलो ८५ रुपयांवरून ७०-७५ रुपयांपर्यंत घसरण झाली. आयातील प्रोत्साहन देण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळेही दोन्ही डाळींच्या दरास घसरण झाली. दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांत डाळीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांचे चेहरे फुलले आहेत. परिणामी, गरिबांच्या घरी वरण आणि पुरणाची पोळी शिजणार हे नक्की.

तुरीचे पीक चांगले
यावर्षी तुरीचे पीक चांगले आहे. तूर बाजारात आल्यानंतर डाळीचे भाव पुन्हा ८,५०० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. पण, त्याकरिता तीन महिने वाट पाहावी लागेल.
- प्रभाकर देशमुख,
अध्यक्ष, किरकोळ किराणा व्यापारी महासंघ

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com