esakal | मतदानाचा टक्का घटला; धक्का कुणाला? | Zilha Parishad Election
sakal

बोलून बातमी शोधा

Election

मतदानाचा टक्का घटला; धक्का कुणाला?

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : जिल्हा परिषदेच्या ७९ व पंचायत समितीच्या १२५ उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी ईव्हीएममध्ये बंद झाले. रात्री उशिरा झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सरासरी ६३ टक्के मतदान झाले. सार्वत्रिक निवडणुकीत ६७ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे घटलेला मतदानाचा टक्क्यांचा धक्का कोणाला बसतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी (ता. ६) सकाळी साडेसात वाजतापासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या १६ आणि पंचायत समितीच्या ३१ जागेवर मंगळवारी पोटनिवडणूक घेण्यात आली. सकाळपासूनच मतदारांचा उत्साह बघायला मिळाला. एकूण ६ लाख १६ हजार १६ मतदार मतदार आहेत. १११५ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळच्या सत्रामध्ये म्हणजेच सकाळी ७.३० ते ९.३० यावेळेत जिल्ह्याच्या जि.प. साठी १०.५० व पं.स. साठी १०.९४ टक्के इतकेच मतदान झाले होते. यानंतर मतदान केंद्रावर गर्दी वाढत गेली.

हेही वाचा: एकामागून एक आठ सिलिंडरचा स्फोट; चार तासांपासून धगधगतेय आग

सकाळी ११.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढली. तेव्हा जि.प. साठी २३.२२ व पं.स. साठी २३.८५ टक्क्यांच्या घरात होती. दुपारी दीड वाजेपर्यंत जि.प. मतदानाच्या टक्केवारीत ३६.९२ ने वाढ झाली. दुपारी साडेतीन वाजतानंतर मतदान केंद्रावर चांगलीच गर्दी झाली होती. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी ६३ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली होती.

सुनील केदार यांनी पोटनिवणूक केली प्रतिष्ठेची

राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी पोटनिवणूक प्रतिष्ठेची केली आहे. आठवडाभरापासून त्यांनी सर्वच मतदारसंघ पिंजून काढले. प्रचार यात्रांचा धडाका लावला होता. याचे फळ त्यांना मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: सारेच झाले सुन्न; आजोबा, तीन चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार

भाजपच्या नेत्यांनी दाखवले नाही स्वारस्य

भाजपच्या नेत्यांनी पोटनिवडणुकीत फारसे स्वारस्य दाखवले नाही. भाजपचे अनेक बडे नेते निवडणुकीच्या दरम्यान नागपूरला हजेरी लावून गेले. मात्र, कोणीही ग्रामीण भागात जाऊन सभा घेतली नाही. जिल्ह्याचे नेते व भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हेसुद्धा फारसे फिरकले नाहीत. निवडणुकीची जबाबदारी आमदार समीर मेघे यांच्यावर सोपविली होती.

राष्ट्रवादीला फटका बसणार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांनी उमेदवारांना वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात प्रदेशातून एकही नेता फिरकला नाही. बंडखोरांनाही कोणी शांत बसवण्याचा प्रयत्न केला नाही. याच राष्ट्रवादीला फटका बसणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिवसेनेना लागणार लॉटरी?

शिवसेनेने स्वबळावर उमेदवार उभे केले होते. भाजप व राष्ट्रवादीच्या भांडणामध्ये शिवसेनेच्या एखाद्या उमेदवाराला विजयी लॉटरी लागू शकते असेही बोलले जात आहे.

loading image
go to top