esakal | नोकरी गेल्याने बनला ड्रग्सतस्कर, उच्चशिक्षित तरुणासह दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime

नोकरी गेल्याने बनला ड्रग्सतस्कर, उच्चशिक्षित तरुणासह दोघांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे लॉकडाउन लागल्यानंतर पुण्यातील मोठ्‍या कंपनीतील नोकरी गेली. बेरोजगार असलेल्या उच्चशिक्षित युवक बेरोजगार झाला. शेवटी त्याने एका मित्राच्या मदतीने ड्रग्स तस्कर बनला. वर्षभरापासून मुंबईतून ड्रग्स तस्करी करून नागपुरात विकणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. सौरभ दादाराव छपाणे (२२, धम्मनगर, आयबीएम रोड) आणि संदीप मुचकुंद पांडे (२१, चिंतामणनगर) अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत.

सौरभ छपाणेचे बीएस्ससीपर्यंत शिक्षण झाले असून तो पुण्यात 'फोन पे' कंपनीत नोकरीवर होता. गतवर्षी कोरोनामुळे त्याची नोकरी गेली. तो बेरोजगार झाला. तो परत नागपूरला आला. कामाच्या शोधात होता. संदीप पांडे हा फुटाळा येथे चायनिजचा ठेला लावत होता. कोरोना काळात त्याचेही दुकान बंद झाले होते. त्यामुळे सौरभ आणि संदीप यांनी एमडी (मेफेड्रोन) तस्करीत उतरण्याचा निर्णय घेतला. मागील एक वर्षापासून ते तस्करी सक्रिय होते. मुंबई येथून एमडी खरेदी करून ते नागपुरात शौकिनांना एमडी पुरवित असत. सौरभ हा एमडी तस्करीत सक्रिय आहे ही माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पीआय सार्थक नेहेते यांना मिळाली होती.

हेही वाचा - 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'चा फज्जा, संपर्कातील हजारो रस्त्यावर

असा रचला सापळा -

११ एप्रिल रोजी सौरभ आणि संदीप हे दोघेही मुंबईला ड्रग्स विकत आणायला गेले होते. पोलिसांना गुंगारा देऊन एमडी घेऊन ते नागपुरात आले. बुधवारी दुपारी दोघेही एमडी विक्री करण्यासाठी बैद्यनाथ चौकात येणार होते. पोलिसांनी पोलिसांनी बैद्यनाथ चौकात सापळा रचला. दोघेही दुचाकीने बैद्यनाथ चौकात आले. पोलिसांनी दोघांनाही सापळा रचून अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ ५ लाख ३४ हजार ८०० रुपयांची ५३.४८ ग्रॅम मिळून आली. पोलिसांनी एमडी पावडर, २ मोबाईल, दुचाकी असा ६ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा - 'मेडिकल'च्या किचनमधील कर्मचाऱ्याचाच कोरोनानं मृत्यू

पोलिसांनी सौरभची चौकशी केली असता फ्रेण्ड्स कॉलनी येथील गौरखेडे कॉम्पलेक्स येथे राहणाऱ्या अंकिश उर्फ गुलाम संजय तुर्केल या कुख्यात गुंडास हा माल देणार होतो, अशी कबुली त्यांनी दिली. सौरभ आणि संदीपला पकडल्याचे समजताच अंकिश हा बैद्यनाथ चौकात न येता पसार झाला. याप्रकरणी गणेशपेठ पोलिस ठाण्यात तिघांवरही गुन्हा नोंदवून सौरभ आणि संदीप यांना अटक केली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय नेहेते यांनी केली.