esakal | प्रेयसीने दिली होती टीप; अवनी ज्वेलर्सवरील दरोड्याचा छडा
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेयसीने दिली होती टीप; अवनी ज्वेलर्सवरील दरोड्याचा छडा

प्रेयसीने दिली होती टीप; अवनी ज्वेलर्सवरील दरोड्याचा छडा

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : जरीपटक्यातील अवनी ज्वेलर्सच्या मालकाच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून २२ लाखांच्या दरोड्याचा नागपूर पोलिसांनी छडा (Two arrested in robbery) लावला. नागपुरातील प्रेयसीने उत्तरप्रदेशातील प्रियकराच्या मदतीने या दरोड्याचा कट रचला होता. पोलिसांनी दोघांना मध्यप्रदेशातून अटक केली तर दोघे फरार झाले. वीरेंद्र सुखदेव यादव (वय २६, रा. प्रतापगड, उत्तरप्रदेश) आणि दीपक राजकुमार त्रिपाठी (वय २४, रा. अलाहाबाद, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी उपराजधानीतील वंदना पांडे (वय २८, रा. कबीरनगर) हिलाही ताब्यात घेतले आहे. (Two-arrested-in-robbery-at-Avni-Jewelers-in-Nagpur)

सोमवारी दुपारी आशीष नावरे (वय ३५, रा. नवीन ठवरे कॉलनी) यांच्या भीम चौक नागसेननगर येथील अवनी ज्वेलर्स येथे चौघांनी पिस्तुल डोक्याला लावून सराफा दुकान लुटून नेले होते. आरोपी दरम्यान मनसर खवासा येथे सीमा तपासणी नाक्यावर आरोपी शेवटचे दिसले होते. दुसरीकडे पोलिसांनी १ जुलैला आरोपींपैकी एक तरुण व एका महिलेसह दागिने घेण्यासाठी दुकानात आल्याचे समजले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित महिलेला शोधून काढले असता ती वंदना पांडे निघाली. ती एका आरोपीची प्रेयसी आहे. रात्री उशीरा तिला ताब्यात घेतले. तसेच त्यांनी दागिने घेण्यासाठी एका एटीएम मशीनमधून पैसे काढल्याची माहिती वंदनाने दिली.

हेही वाचा: १२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

दुसरीकडे मध्यरात्री आरोपीने प्रेयसी वंदनाच्या भ्रमणध्वनीवर आपण जबलपूर ते कटनी मार्गावर छपडा येथे प्रेम लॉजमध्ये थांबल्याची माहिती दिली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कटनी येथील त्यांचे मित्र पोलीस महानिरीक्षक, तसेच डीसीपी विनीता शाहू यांनी जबलपूरच्या बॅचमेट पोलिस अधिक्षकांशी संपर्क साधून मदत मागितली. मध्यरात्री १.३० वाजता जबलपूर व कटनी पोलिसांनी मोहीम राबवली.

छपडा गावाजवळ दरोडेखोरांची एक दुचाकी पोलिसांच्या कारला धडकली. यात दोघेजण खाली पडून जखमी झाले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या दुचाकीवरील आरोपी दुचाकी सोडून जंगलात पळून गेले. अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, दिलीप झळके आणि नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त विनीता शाहु, नीलोत्पल, नुरुल हसन आणि गजानन शिवलिंग राजमाने उपस्थित होते.

हेही वाचा: पेरणीसाठी गेलेली आई परतलीच नाही, शेवटी मृतदेह लागला हाती

प्रेयसीला पाठवले फोटो

एक दरोडेखोर कृष्णा हा वंदनाचा प्रियकर आहे. तिचे वडील लष्करातून सेवानिवृत्त आहेत. वडील घरी नसताना तो तिला भेटण्यासाठी येत होता. त्यांना लग्न करायचे होते. त्यामुळे दागिणे आणि पैसे लागणार म्हणून त्यांनी अवनी ज्वेलर्स लुटण्याचा कट रचला. आठ दिवसांपूर्वी कृष्णाने वंदनासह ज्वेलर्समध्ये जाऊन रेकी केली होती. दुकान लुटून नेल्यानंतर किती दागिणे चोरी केले, याचे फोटोही वंदनाला पाठवले होते.

असा लागला सुगावा

सीसीटीव्ही फुटेजमधील युवक आठ दिवसांपूर्वी युवतीसोबत दुकानात आल्याचे आशीष यांनी सांगितले. त्या तरुणीने भीम चौकातीलच एका एटीएममधून पैसे काढल्याचे एका फुटेजमध्ये दिसले. पोलिसांनी बँकेशी संपर्क साधून तरुणीचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानंतर पोलिसानी वंदना पांडे हिला ताब्यात घेतले. तिला ‘प्रसाद’ देताच तिने कट रचल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून १ पिस्तुल, २ जिवंत काडतुसे, ४ मोबाईल, एक किलो चांदी आणि रोख ३८ हजार रुपये जप्त केले.

(Two-arrested-in-robbery-at-Avni-Jewelers-in-Nagpur)

loading image