मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ढाल बनून उभे राहू

udhav thakare says Vidarbha in our hearts, will not allow injustice Political news
udhav thakare says Vidarbha in our hearts, will not allow injustice Political news

नागपूर : विदर्भ महाराष्ट्राचे अविभाज्य अंग आहे. विदर्भ आमच्या हृदयात आहे. त्यामुळे या प्रदेशावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. जर कुणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ढाल बनून उभे राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले.

नागपुरातील विधानभवनात विधिमंडळ सचिवालयाच्या कायमस्वरूपी कक्षाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. या समारंभात ते मुंबईतून ऑनलाइन सहभागी झाले होते. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते कक्षाचे उद्‍घाटन झाले.

यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या ऑनलाइन उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कर्जमाफीचा निर्णय येथेच झाला होता. कोरोनामुळे अधिवेशन होऊ शकले नाही. नागपुरात सचिवालय सुरू झाले आहे. हे कार्यालय वर्षभर सुरू राहणार आहे. अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्ण झाली आहे.

आता खऱ्या अर्थाने नागपूर आणि मुंबई यांचे नाते अधिक दृढ झाले आहे, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन कक्षात सक्षम आणि विदर्भात काम करण्यास इच्छुक अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच नियुक्ती देण्याची सूचना केली. नीलम गोऱ्हे, नितीन राऊत, अनिल देशमुख व सुनील केदार यांनीही विचार व्यक्त केले.

भाजपला टोला

सध्या अधिकाराच्या केंद्रीकरणावर भर आहे. सर्व काही आपल्याच हाती असावे असे वातावरण आहे. असे असतानाही आम्ही अधिकारांचे विकेंद्रीकरणावर करीत आहोत, असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

ऑनलाइन पद्धतीने सहभागी होता येईल
अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी मुंबईत यावे लागते. हे काहींना जमत नाही. त्यांच्यासाठी येथून ऑनलाइन पद्धतीने सहभागी होता येईल अशी व्यवस्था या कार्यालयात करण्यात येईल.
- अनिल परब,
संसदीय कामकाज मंत्री.

गजभिये यांचे कौतुक

नागपूर येथे सचिवालय कक्ष सुरू करण्यासाठी तत्कालीन आमदार प्रकाश गजभिये यांनी अधिवेशनात मुद्दा मांडला होता. त्यांच्यामुळे व अध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठपुराव्यातून हा कक्ष सुरू झाल्याचे सांगत सर्वांनीच प्रकाश गजभिये यांचे कौतुक केले.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com