
नागपूर : विद्यापीठाच्या इकोफ्रेंडली योजनेवर धूळ ; सायकली पडून
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसर बराच मोठा आहे. या परिसरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध विभागात जाण्यासाठी ‘इको फ्रेंडली’ पर्याय देण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाद्वारे दहा ते पंधरा सायकल खरेदी केल्या होत्या. मात्र, आजपर्यंत या सायकलीचा उपयोग करण्यात आलेला नाही. वित्त विभागाच्या कार्यालयासमोर असलेल्या शेडमध्ये सायकली धुळखात पडल्या आहेत.
हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष
विद्यापीठाचा परिसर हा ३२७ एकरमध्ये पसरलेला आहे. यामध्ये विविध प्रशासकीय कार्यालये, ३९ विभाग आणि तीन महाविद्यालयाचा समावेश आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात. यामध्ये प्रामुख्याने अमरावती मार्गावर असलेल्या महात्मा फुले शैक्षणिक परिसरात असलेल्या विविध विभागांमध्ये विद्यार्थी शिकत असल्याने त्यांची वर्दळ सातत्याने या परिसरात असते. याशिवाय या परिसरात विद्यापीठाचा वित्त विभाग असल्याने शुल्क भरण्यासाठीही विद्यार्थी या परिसरात येतात. परिसरात असलेल्या मुख्य इमारतीपासून विभाग दूर असल्याने या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पायी जावे लागते.
हेही वाचा: "राहुल गांधी हे फेक गांधी, भाजपचं करतंय महात्मा गांधींच स्वप्न पूर्ण"
त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्या विभागापर्यंत इको फ्रेंडली पर्याय देण्यासाठी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी या परिसरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल देत, त्यांच्या त्यांच्या विभागापर्यंत जाण्याची सोय करुन देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विद्यापीठाच्या प्राधीकरणाने प्रस्ताव सादर करीत, निधीची तरतूद केली. या तरतूदीतून विद्यापीठाने दहा ते पंधरा सायकल खरेदी केल्यात. कोरोनामुळे टाळेबंदी लावण्यात आल्याने ही योजना थंडबस्त्यात पडली. मात्र, त्यानंतर टाळेबंदी उठल्यावर पुन्हा ही योजना सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर योजना आणि सायकल दोन्हीवर धूळ बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केवळ योजनांचा फार्स करुन त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करण्याचे काम विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांना विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
Web Title: Universitys Eco Friendly Plan Fail Dust On Cycle Nagpur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..