esakal | बीएड परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा? लिपिक कोरोना संक्रमित

बोलून बातमी शोधा

BEd Exam
बीएड परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा? लिपिक कोरोना संक्रमित
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे लिपिक कोरोना संक्रमित असल्याने बीएडच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसमोर दहा दिवसांच्या आत परीक्षा अर्ज कसा भरायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकरिता विद्यापीठाने ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचीसुद्धा व्यवस्था केलेली नाही. बी.एड. प्रथम सत्रांचा परीक्षेचा निकाल १७ एप्रिलला जाहीर झाला आहे. यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना १० दिवसांच्या आत परीक्षा भरण्याची मुदत देण्यात आली आहे.

हेही वाचा: प्रशासन नाचवते कागदी घोडे; राज्य कामगार रुग्णालयात वाढल्या नाहीत खाटा

दीड वर्षापासून हा निकाल रखडला होता. निकालातील गोंधळामुळे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. केवळ ३७ टक्के निकाल लागला असून अनेक विद्यार्थी एकाच विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयात जाणे आवश्यक आहे. बी.एड.च्या अनेक महाविद्यालयातील लिपिक, प्राध्यापक व त्यांचे नातेवाईक कोरोना बाधित आहेत. कोरोनाचे रुग्ण रोज वाढत असल्याने भीतीचे आहे. त्यामुळे विद्यापीठाने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी किंवा ऑनलाइन सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: कुंभमेळ्यावरून येणारे १४ दिवस क्वॉरंटाईन; पोलिस प्रशासन गंभीर

निकालावरही शंका

बी.एड.चा दुसरा पेपर ‘प्रस्पेक्टिव इन सायकॉलॉजी अँड टिचिंग अँड लर्निंग डेव्हलपमेंट’विषयात विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण दिलेले आहे. अनेकांना या विषयात अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. हा पेपर पूर्ण लिहूनही त्यांना यामध्ये अनुत्तीर्ण करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. १०० गुणांच्या पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी ५० गुण लागतात, तर ५० गुणांच्या पेपरमध्ये २५ गुण आवश्यक आहे. शंभर गुणांचा पेपरमध्ये अनेकांना ५०, ५१, ५३, ५६ असेच गुण आहेत. यापेक्षा अधिकचे गुण नाही. या गुणांची टक्केवारी पाहता विद्यार्थ्यांनी मूल्यांकनावर शंका उपस्थित केली आहे.